PCMC Crime News : गोळीबारानं सांगवी हादरलं, पिंपरी चिंचवडमध्ये टोळी युद्धातून गोळीबार

| Published : May 30 2024, 01:12 PM IST / Updated: May 30 2024, 04:43 PM IST

pimpri chinchwad

सार

पिंपरी-चिंचवडमधील नवी सांगवी गोळीबाराच्या घटनेने हादरलं आहे. बुधवारी रात्री पोलीस ठाण्याच्या जवळच गोळीबार झाल्याची घटना घडली. टू व्हिलरवरुन दोघांनी येऊन एका तरुणावर थेट गोळीबार केला आणि या गोळीबारात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये टोळी युद्धातून हत्यासत्र सुरू झालं. पिंपरी-चिंचवडमधील नवी सांगवी गोळीबाराच्या घटनेने हादरलं आहे. काल 29 मे बुधवारी रात्री पोलीस ठाण्याच्या जवळच गोळीबार झाल्याची घटना घडली. टू व्हिलरवरुन दोघांनी येऊन एका तरुणावर थेट गोळीबार केला आणि या गोळीबारात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. योगेश जगताप विरुद्ध गणेश ढमाले यांच्या वर्चस्वाच्या लढाईत हा गोळीबार झाल्याचं समोर आलं आहे. दीपक कदम असं गोळीबार झालेल्या तरुणाचं नाव आहे.

योगेश जगताप विरुद्ध गणेश ढमाले यांच्या वर्चस्वाच्या लढाईत आजवर तिघांचे जीव गेलेत. सांगवी परिसरात काल (बुधवारी) रात्री झालेला गोळीबार हा याचाच एक भाग होता. दीपक कदमवर गोळ्या झाडत त्याची हत्या करण्यात आली. डिसेंबर 2021ला योगेश जगतापची गोळीबारात हत्या झाली, याचा बदला घेण्यासाठी ढमाले टोळीतील रेहान शेखची काही महिन्यांपूर्वी धारदार शस्त्राने खून करण्यात आला आणि तिसरा नंबर दीपक कदमचा लागला. दीपक हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. यापूर्वी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. दीपकच्या थेट चेहऱ्यावर गोळीबार करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

रात्री साडे दहाच्या सुमारास दीपक सांगवीमधील सिद्धेश्वर फॅमिली शॉपमध्ये रोजच्या प्रमाणे पान खाण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने पान घेतलं आणि रस्त्यावर उभा होता. याचवेळी रस्त्यावरुन दोन अज्ञात व्यक्ती या परिसरात पोहचले आणि चालत्या दुचाकीवरुन त्याने दीपकच्या डोळ्यात आणि पाठीवर गोळ्या घातल्या. यात दीपकचा जागीच मृत्यू झाला. वर्चस्वाच्या वादातून हा मृत्यू झाला आहे आणि त्याच्यावर झालेल्या गोळीबारामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा टोळीयुद्ध पाहायला मिळालं आहे.

2021ला योगेश जगतापची हत्या झाली अन् आता...

याच परिसरात असलेल्या काटेपुरम सोसायटीजवळी योगेश जगतापचा पाठलाग करुन त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. याच हत्येचा बदला घेण्यासाठी काही महिन्यांपूर्वी ढमाले टोळीतील रेहान शेखची हत्या करण्यात आली. या सगळ्याचा बदला घेण्यासाठी आता दीपक कदमवर गोळीबार करण्यात आला. याच एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. मात्र टोळीयुद्धातून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हे टोळीयुद्धी कधी थांबणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आणखी वाचा :

२४ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार?, हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट