सार
काही दिवसांपूर्वीच हवामान विभागाने यंदाचा मान्सून ३१ मे ते १ जून दरम्यान केरळात दाखल होईल, असं सांगितलं होतं.
तापमानात झालेली वाढ आणि उकाड्यामुळे सध्या सगळेच जण हैराण झाले आहेत. प्रत्येक जण सध्या मान्सूनची वाट बघतो आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. येत्या २४ तासांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या २४ तासांत नैऋत्यू मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वीच हवामान विभागाने यंदाचा मान्सून ३१ मे ते १ जून दरम्यान केरळात दाखल होईल, असं सांगितलं होतं. मात्र, आता एक दिवस आधीच मान्सून केरळात दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून केरळमध्ये दाखळ होण्यासाठी अरबी समुद्र आणि हिंदी महासागरामध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढच्या ७ ते ८ दिवसांत महाराष्ट्रात दाखल होईल, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
केरळमध्ये गेल्या १५ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यात मार्च-मे दरम्यान ४६५ मिमी पाऊस पडला आहे. ज्यापैकी ९० टक्क्यांहून अधिक पाऊस केवळ मे महिन्यात झाला आहे. यावर्षी, बंगालच्या उपसागरात मान्सून मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सून लवकर पोहोचण्यास मदत होईल, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. ईशान्य भारतात ५ जूनपर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा :
मुंबईत आजपासून ५ टक्के पाणीकपात, ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू होणार