सार
शिवसेना उबाठा गटाच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना थेट अहमदशाह अब्दालीचा राजकीय वंशज असे म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळतेय.
पुण्यात शनिवारी शिवसेना उबाठा गटाच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना अहमद शाह अब्दालीची उपमा दिली आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, काही दिवसांपूर्वी पुण्यात भाजपाचा एक कार्यक्रम झाला. इतिहासात आपण डोकावलं, तर शाहिस्तेखान जरा तरी हुशार होता, असं म्हणावं लागेल. त्याचं बोटावर निभावलं. तीन बोटं कापली गेल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात नाही आला. त्यातनं काही शहाणपण यांनी घेतले असते तर परत महाराष्ट्रात आले नसते, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षरित्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. पण ते अमित शाह परत का आले? तर महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या फटक्यांचे वळ कुणाकुणाच्या अंगावर उमटले. हे पाहण्यासाठी ते आले. अहमदशाह अब्दालीचा राजकीय वंशज हा पुण्यात आला होता. तो अहमद शाह होता आणि हे अमित शाह आहेत. अहमद शाहचा राजकीय वशंच इथे वळवळायला आला होता. अशी घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली. त्यामुळे आता अहमद शाह अब्दाली कोण आहे ते आपण थोडक्यात पाहूयात
कोण होता अहमद शाह अब्दाली?
मुघलांकडून कोहिनूर हिसकावून त्यांचा खजिना लुटणारा नादिरशाह काही वर्षांनी मरण पावला. भारतावर हल्ला करून 8 वर्षांनंतर त्यांनी जगाचा निरोप घेतला, पण निघताना त्यांनी एका व्यक्तीचे असे कौतुक केले की, त्याचे नशीबच पालटले. ते नाव अहमदशाह अब्दाली. मुघलांना गुडघ्यांवर आणणाऱ्या नादिरशाहने मृत्यूपूर्वी म्हटले होते की, मला तुरान, इराण किंवा भारतात असा एकही माणूस दिसला नाही जो क्षमता आणि आवेशात अहमद शाह अब्दालीशी बरोबरी करू शकेल.
अहमद शाह अब्दालीला अशी मिळाला दुर्राणी पदवी
अहमद शाहची क्षमता पाहून एका सूफी संताने त्यांना दुर-ए-दुरान म्हणजेच मोत्यांमधला सर्वोत्कृष्ट मोती ही पदवी दिली. यानंतर त्याच्या कुळाचे नाव दुर्राणी पडले आणि ते अहमद शाह दुर्राणी म्हणून ओळखले जाऊ लागले. हळूहळू अहमद शाहने अफगाण जमातींमधील परस्पर वैर दूर करून त्यांना एकत्र आणण्याचे काम केले. अशा प्रकारे त्याने अफगाण देशाचा पाया घातला आणि त्याला अफगाणिस्तानचा नायक म्हटले जाऊ लागले.
'अफगाण लोकांसाठी अहमद शाह अब्दाली देवापेक्षा कमी नाही'
‘अहमद शाह दुर्रानी: क्रिएटर ऑफ मॉडर्न अफगाणिस्तान’ या पुस्तकात भारतीय इतिहासकार गंडा सिंग यांनी लिहिले आहे की, अहमद शाह हे डोक्यापासून पायापर्यंत शुद्ध अफगाण होते. ज्यांनी देश सुधारण्यासाठी आपले जीवन समर्पित केले होते. त्यांनी संपूर्ण अफगाणिस्तान स्वतंत्र करून एकत्र केले. हेच कारण आहे की, आजही तो अफगाण लोकांसाठी देवापेक्षा कमी नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्यांची स्तुती करताना कंटाळा येत नाही. तिथले लोक त्यांना अहमद शाह बाबा आणि अहमद शाह महान असेही म्हणतात.
अहमद शाह अब्दाली सैन्यात शिपाई ते थेट झाला राजा
अब्दाली नादिरशहाच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाला. आपल्या मार्शल आर्टच्या कौशल्याच्या जोरावर तो अल्पावधीतच चर्चेचा केंद्रबिंदू बनला होता. नादिरशहाने खूश होऊन त्याला सैन्याचा मुख्य नेता बनवले. त्याच्याकडे 6 हजार सैनिकांची फौज होती. नादिरशहाच्या मृत्यूनंतर सर्वांनी मिळून त्याला आपला राजा म्हणून निवडले. कंदाहारला पोहोचल्यावर त्याने बादशहाच्या मृत्यूची घोषणा केली आणि अफगाण समाजाचे लोक अब्दालीच्या झेंड्याखाली एकत्र आले. कंदाहारमधील राज्यकारभार आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत केल्यानंतर तो अफगाणिस्तानातील प्रांत जिंकण्यासाठी निघाला.
भारतावर नियोजित हल्ला करुन पानिपतची लढाई अब्दाली जिंकली
अफगाणिस्तानातील अनेक प्रांत जिंकून घेतल्यानंतर त्याने भारतावर हल्ला करण्याची योजना आखली. बाबराप्रमाणे त्यानेही भारतावर पाच वेळा हल्ले केले. अखेरच्या प्रयत्नात तो यशस्वी झाला आणि पानिपतची लढाई जिंकली.
उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना का म्हटलं अब्दाली?
भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काही दिवसांपूर्वी पुण्यातील बालेवाडी येथे सभा झाली होती. या सभेत अमित शाह यांनी शिवसेना उबाठा गटावर टीका केली होती. "उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत. औरंगजेब फॅन क्लब राज्याला सुरक्षित ठेवू शकतात का?" असा सवाल करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.
आणखी वाचा :
शरद पवार गटाने तटकरेंचा 'तो' व्हिडिओ केला शेअर, काय आहे व्हिडिओत जाणून घ्या