सार

पुण्यामध्ये बुधवारी सकाळी एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नेणाऱ्या वाहनाला आग लागल्याची घटना घडली. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. पण याच घटनेसंदर्भात काही धक्कादायक खुलासे आता पोलिसांकडून करण्यात आले आहेत. 

Pune Bus Fire Update : पुण्यात एका खासगी कंपनीच्या बसला आग लागल्याच्या प्रकराणात मोठा खुलासा झाला आहे. प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांकडून असा दावा करण्यात आला आहे की, ड्रायव्हरने स्वत:हून बस पेटवली. याबद्दलचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या मते, बस ड्रायव्हर आपल्या सॅलरीमध्ये झालेल्या कपातीमुळे नाराज होता.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस चालकाने मुद्दाम गाडीला आग लावत हा एक अपघात असल्याचे दाखवले. पण तपासात असे दिसून आले की, बस चालकाने कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार केली होती आणि सूड म्हणून ही घटना घडवून आणली. खरंतर, गाडी पेटवण्यासाठी त्याला रसायन कोठून मिळाले याचा सध्या तपास केला जात आहे. ड्रायव्हरच्या विरोधात बीएनएसच्या संबंधित कलम (103 आणि 109) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे."

 

सॅलरी कापल्याने होता नाराज

पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले की, आरोपी बस ड्रायव्हर जनार्दन हंबर्डीकरच्या सॅलरीमध्ये नुकतीच कपात करण्यात आली होती. यामुळे जनार्दन हंबर्डीकर नाराज होता. पिंपरी-चिंचवडचे डीसीपी विशाल गायकवाड यांनी माहिती देत म्हटले की, काही कर्मचाऱ्यांसोबत त्याचे वादही झाले होते. यामुळे हंबर्डीकरला त्यांचा बदला घ्यायचा होता. आगीमध्ये होरपळून मृत्यू झालेले कर्मचाऱ्यांसोबतच हंबर्डीकरचे वाजले होते.

केमिकल खरेदी करुन पेटवली बस

बसला आग लागल्याची घटना बुधवारी (19 मार्च) सकाळी पुणे शहराजवळील हिंजवडी येथे घडली. त्यावेळी व्योमा ग्राफिक्सच्या बसमध्ये 14 कर्मचारी होते. पोलीस आयुक्तांनी म्हटले की, "आरोपीने ज्वलनशील रसायन खरेदी केले होते. याशिवाय बस पुसण्यासाठी एक कापडही घेतले होते. गुरुवारी ज्यावेळी बस हिंजवडीजवळ पोहोचली तेव्हा माचिसने कापडाला आग लावली."

बस ड्रायव्हरही जळाला

बसला आग लावल्यानंतर त्यामध्ये ड्रायव्हर जनार्दन स्वत:ही जळाला. पण काही अन्य जणांसोबत जनार्दन बसमधून खाली उतरला. पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले की, आरोपी ड्रायव्हरवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यानंतर त्याला अटक केली जाणार आहे. या घटनेत एकूण 10 जण होरपळले गेले. यापैकी दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. दुर्घटनेत शंकर शिंदे, राजन चव्हाण, गुरुदास लोकरे आणि सुभाष भोसले यांचा मृत्यू झाला आहे.