नारायण राणे आणि भागवत कराड यांना मोठा धक्का, मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान नाही

| Published : Jun 09 2024, 01:47 PM IST

Narayana Rane
नारायण राणे आणि भागवत कराड यांना मोठा धक्का, मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मात्र यावेळी नारायण राणे आणि भागवत कराड यांना मोठा धक्का बसला आहे.

 

नरेंद्र मोदी आज संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी मोदी यांच्यासोबत अनेक नेते मंत्रिपदाचीही शपथ घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील एकूण सहा जणांना आतापर्यंत मंत्रिपदासाठी दिल्लीतील भाजपच्या नेतृत्त्वाकडून फोन गेलेला आहे. असे असतानाच मात्र कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे आणि मराठवाड्यातील नेते भागवत कराड यांना मंत्रीमंडळ स्थान दिले जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. भाजप हायकमांडकडून राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रिमंडळात सहभागी करून घेता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये कोकण आणि मराठवाड्याचे नेतृत्त्व आता कोण करणार? या भागातून अन्य कोणत्याच नेत्याला संधी मिळणार नाही का? असे प्रश्न विचारले जात आहेत.

मुरलीधर मोहळ, प्रतापराव जाधव यांना संधी

नारायण राणे आणि कराड यांना संधी मिळणार नसली तरी दुसरीकडे भाजपने राज्यात मराठा मतदारांची नाराजी लक्षात घेऊन मंत्रिमंडळात मराठा समाजाच्या नेत्यांना स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये मुरलीधर मोहोळ, प्रतापाराव जाधव यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. आज संध्याकाळी सव्वा सात वाजता मोदी यांच्यासोबत हे नेते मंत्रिपदाची शपथ घेताना पाहायला मिळतील.

अन्य मराठा आणि ओबीसी नेत्याला संधी

भागवत कराड हे ओबीसींचे नेते आहेत. त्यांच्या जागेवर भाजपने रक्षा खडसे यांना भाजपने संधी दिली आहे. खडसे या उत्तर महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे एका मराठा आणि ओबीसी नेत्याच्या बदल्यात दुसऱ्या मराठा आणि ओबीसी नेत्याला मंत्रिपदाची संधी देण्यात येणार आहे.

आणखी वाचा:

narendra modi cabinet: 'या' खासदारांना दिल्लीतून आले फोन, मोदी 3.0 मंत्रिमंडळात होणार समावेश