Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी संध्याकाळी एका भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झाल्यामुळे झालेल्या या दुर्घटनेत किमान ५ जणांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

पुणे: शहराला हादरवणारी घटना! पुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा मृत्यूचा थरार घडला आहे. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने अनेक वाहनांना चिरडत नेलं. अपघात इतका भीषण होता की काही वाहनं अक्षरशः चक्काचूर झाली. या अपघातात किमान 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात

पोलिसांच्या माहितीनुसार, पुणे–बंगळुरू महामार्गावरून जाणाऱ्या कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कंटेनरने समोर येणाऱ्या अनेक वाहनांना एकामागोमाग धडक दिली. धडकेनंतर कंटेनरला आग लागली, तर काही कार्स रस्त्याच्या मधोमध उलटल्या गेल्या. काही क्षणांतच परिसरात भीषण गोंधळ उडाला.

वाहनांचा चुराडा, दृश्य हृदयद्रावक

अपघातात अनेक गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मारुती डिझायर कार आणि मिनी व्हॅनचा अक्षरशः चुराडा झाला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, धडकेच्या वेळी एक कार दोन कंटेनरच्या मध्ये अडकली होती. त्या कारमध्ये ३ ते ५ जण होते, अशी माहिती समोर आली आहे.

दोन्ही कंटेनरना आग, अग्निशामक दल घटनास्थळी

अपघातानंतर दोन्ही कंटेनरनी अचानक पेट घेतला. तातडीने दोन अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग नियंत्रणात आणण्यात आली. दरम्यान, जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

प्रशासन आणि पोलिसांकडून तपास सुरू

या भीषण घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ महामार्गावरील वाहतूक थांबवली असून, अपघाताचे कारण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी तपास सुरू आहे. नवले पुलावरील अपघातांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले असून, या भागातील वाहतूक व्यवस्थेबाबत प्रशासनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.