Nashik Municipal Election 2026 : नाशिक महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध स्ट्राँग रूम परिसरांजवळील रस्त्यांवर वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा.
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी आज, गुरुवारी (दि. १५) मतदान होत असून, उद्या शुक्रवारी (दि. १६) मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ‘स्ट्राँग रूम’ परिसरांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी, यासाठी वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.
भाभानगर आणि मुंबई नाका परिसरात निर्बंध
दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर तसेच अटल दिव्यांग स्वाभिमान भवन, मुंबई नाका येथे मतमोजणी केंद्र असल्याने गायकवाड सभागृहामागील नंदिनी नदीकाठालगतचा रस्ता पूर्णतः बंद राहील.
पर्यायी मार्ग: वडाळा व इंदिरानगरकडून येणारी वाहतूक नागजी सिग्नलमार्गे पुढे रवाना होईल, तर दीपालीनगरमार्गे डाव्या बाजूने वाहतूक वळवण्यात आली आहे.
नाशिकरोड विभागात वाहतूक बदल
मनपा विभागीय कार्यालय, नाशिकरोड परिसरात विहितगावकडून बिटकोकडे ये-जा करणारा रस्ता बंद राहील.
पर्यायी मार्ग : सत्कार पॉइंटमागील सुभाष रोड, मुक्तिधाम चौक, सुराणा चौक मार्गे वाहतूक वळवली जाईल.
सामनगावरोड परिसरात प्रवेशबंदी
शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज, सामनगावरोड येथे पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातील दोन्ही बाजूंचे रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत.
पर्यायी मार्ग : चेहेडीगावरोड ते सामनगावरोड आणि सामनगाव रोडकडून चेहेडीगावकडे जाणारा मार्ग वापरावा.
डीजीपीनगर व पंचवटी भागात निर्बंध
वंदे मातरम हॉल, डीजीपीनगर-१ येथे हॉलकडे जाणाऱ्या मार्गावर प्रवेश बंद आहे.
पर्यायी मार्ग : टी-पॉइंट रविशंकर मार्गे सावतामाळी कॅनॉल रोडने डीजीपीनगर-वडाळागावाकडे वाहतूक वळवण्यात आली आहे.
भोरे नाट्यगृह, कमलनगर (पंचवटी) येथे कमलनगर गोकुळधाम सोसायटी ते नाट्यगृहापर्यंतचा रस्ता तसेच तारवालानगर-अमृतधाम रस्त्यावरील उपरस्ता बंद राहील.
पर्यायी मार्ग : कमलनगर-हिरावाडी सर्कलमार्गे वाहतूक सुरू राहील.
सिडको, सातपूर आणि हिरावाडी परिसरात बदल
प्रबोधनकार ठाकरे सभागृह, सिडको येथे महाले पेट्रोलपंप ते सिंहस्थनगर (राका चौक) तसेच स्टेट बँक चौक ते परदेशी चौक हा रस्ता बंद राहील.
पर्यायी मार्ग : गुन्हे शाखा युनिट-२ कार्यालयासमोरून आश्विननगर व लॉरेन्स स्कूलमार्गे मोरवाडी रस्ता वापरावा.
सातपूर क्लब हाउस, क्रीडांगण परिसरात नाशिक ऑक्सिजन कंपनी ते पंढरीनाथ गांगुर्डे मार्ग बंद आहे.
पर्यायी मार्ग : व्हिक्टर पॉइंटहून एमआयडीसीकडे जाणारी वाहतूक भारत गॅस गुदाम व महिंद्र मार्गे वळवण्यात आली आहे.
मीनाताई ठाकरे स्टेडियम, हिरावाडी येथे मुंबई-आग्रा महामार्गावरील समांतर रस्ते तसेच के. के. वाघ कॉलेज ते स्टेडियम दरम्यानचा मार्ग बंद राहील.
पर्यायी मार्ग : उड्डाणपुलाखालील मुख्य रस्ता आणि हिरावाडी–काट्या मारुती चौकमार्गे प्रवास करावा.


