सार

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कधीकाळी आपल्यापासून दूर गेलेल्या नेत्यांना पुन्हा सोबत घेण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.

 

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात आता राजकीय पक्षांनी काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आपल्या स्वतंत्र पक्षाला ताकद देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कधीकाळी आपल्यापासून दूर गेलेल्या नेत्यांना पुन्हा सोबत घेण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आता माजी केंद्रीय मंत्री आणि पवार यांच्या निकटवर्तीय राहिलेल्या सूर्यकांता पाटील या पुन्हा एकदा स्वगृही परतणार असल्याची माहिती आहे. सूर्यकांता पाटील या आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील असे समजते. २०१४ साली राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पाटील यांची तब्बल १० वर्षांनंतर पुन्हा घरवापसी होणार आहे.

सूर्यकांता पाटील या भाजपमध्ये हदगाव विधानसभा संयोजक म्हणून काम पाहत होत्या. मात्र नुकतेच त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहीत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह इतर पदांचा राजीनामा दिला. त्यानंतर आता त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार आहेत. तसंच त्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणूकही लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूर्यकांता पाटील यांचा राजकीय प्रवास

शरद पवार यांच्या जवळच्या कार्यकर्त्या म्हणून ओळख राहिलेल्या सूर्यकांता पाटील यांची कारकीर्द चढती राहिली आहे. नांदेड नगरपालिकेत नगरसेवक म्हणून आपल्या कामाची चुणूक दाखविल्यानंतर १९८० मध्ये हदगाव मतदारसंघातून निवडून येत त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर १९८६ मध्ये काँग्रेसकडून त्या राज्यसभेवर गेल्या तर १९९१, १९९८ आणि २००४ असे तीन वेळा त्या लोकसभेत पोहचल्या. केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री या पदाची धुराही त्यांनी सांभाळली. मात्र नंतरच्या काळात लोकसभा निवडणुकीवेळी हिंगोली मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तरीही विधान परिषदेवर वर्णी लागेल अशी अपेक्षा होती. परंतु पक्षाने रामराव वडकुते या नव्या चेहऱ्याला मैदानात आणले. त्यानंतर सूर्यकांता पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर झाल्या. २०१४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता.

राजीनामा देताना काय म्हणाल्या पाटील?

'मी माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा तथा माझ्या हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा देत आहे. आपल्या सोबत गेल्या १० वर्षात खूप काही शिकता आले. तालुक्यात बुथ कमिटीपर्यंत काम केले. आपण दिलेल्या संधीसाठी मी आपली व भारतीय जनता पार्टीची अत्यंत आभारी आहे. मी आपला निरोप घेत आहे. प्रत्यक्ष भेटीचा प्रयत्न केला. पण आपल्या व्यस्ततेमुळे ते शक्य झाले नाही. कोणतीही कटुता मनात न ठेवता राजीनामा देत आहे, तो स्वीकारावा ही नम्र विनंती' असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उद्देशून लिहिलेल्या राजीनामा पत्रात सूर्यकांता पाटील यांनी म्हटले आहे.