नागपूरच्या गोधनी ग्रामपंचायत परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्लांटमध्ये रविवारी मध्यरात्री क्लोरीन गॅसची गळती झाली. गॅस पसरल्यानंतर ४० हून अधिक नागरिकांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाला.

मुंबई : नागपूरच्या गोधनी ग्रामपंचायत परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्लांटमध्ये मध्यरात्री क्लोरीन गॅसची गळती झाल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी मध्यरात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. गॅस गळतीनंतर परिसरातील २०० मीटरपर्यंतचा भाग तातडीने रिकामा** करण्यात आला. गॅसच्या संपर्कात आल्याने ४० हून अधिक नागरिकांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाला असून, १५ हून अधिक जणांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गॅस गळतीनंतर परिसरात भीतीचे वातावरण

प्लांटमधील कर्मचाऱ्यांना सुरुवातीला गॅस गळती झाल्याचे लक्षात आले. मात्र, तोपर्यंत क्लोरीन गॅस हळूहळू आजूबाजूच्या परिसरात पसरला. त्यानंतर स्थानिक नागरिकांना मळमळ, उलट्या आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याची माहिती समोर आली.परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने प्लांटच्या आजूबाजूचा २०० मीटरपर्यंतचा परिसर रिकामा केला. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

१५ हून अधिक जणांना श्वसनाचा त्रास

क्लोरीन गॅसच्या संपर्कामुळे ४० हून अधिक नागरिकांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाला आहे. त्यापैकी १५ हून अधिक जणांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

NDRF आणि अग्निशमन दलाचे बचावकार्य

घटनेची माहिती मिळताच NDRFचे पथक आणि महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. गॅस गळतीचा धोका कमी करण्यासाठी आणि परिसर सुरक्षित करण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, यासाठीही आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

गॅस गळतीचे कारण अद्याप अस्पष्ट

क्लोरीन गॅसची गळती नेमकी कशामुळे झाली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून घटनेचा तपास सुरू आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येत आहे.