सार
राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये वळीवाचा पाऊस झाला आहे. त्यामुळे आता नागरिकांना मान्सूनचे वेध लागले आहेत. भारतीय हवामान खात्याकडून महत्त्वाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई: राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये वळीवाचा पाऊस झाला आहे. त्यामुळे आता नागरिकांना मान्सूनचे वेध लागले आहेत. भारतीय हवामान खात्याकडून महत्त्वाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून (Monsoon) 19 मे च्या आसपास दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांच्या परिसरात दाखल होईल. त्यानंतर नैऋत्य मोसमी वारे हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेल्या केरळमध्ये प्रवेश करतील. हवामान खात्याकडून अद्याप मान्सूनच्या केरळमधील आगमनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, सध्या वातावरणाचा नूर पाहता गेल्यावर्षीच्या तुलनेत देशात आणि राज्यात मान्सून लवकर सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.
एरवी मान्सूनचा पाऊस 21 मे च्या आसपास अंदमानमध्ये दाखल होतो. अंदमानमध्ये सुमारे 24 तास पाऊस पडल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे जाहीर केले जाते. मात्र, यंदा मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल बंगालच्या उपसागरातील वातावरणाच्या स्थितीवर अवलंबून असते. परिणामी मान्सूनच्या वाटचालीत कोणतेही अडथळे न आल्यास साधारण 1 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल. तर महाराष्ट्रात मान्सून 8 जूनच्या आसपास सक्रिय होईल. गेल्यावर्षी राज्यात मान्सून 16 जूनला दाखल होता. परंतु, यंदा कोकणात पाऊस लवकर दाखल होण्याची शक्यता आहे.
एप्रिल महिन्यापासून राज्यातील तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे. अनेक भागांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. तर मुंबई आणि कोकणाच्या परिसरात उकड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे मान्सूनचा पाऊस कधी येणार, याचे वेध आता सर्वांना लागले आहेत. याशिवाय, राज्यातील बहुतांश शेतकरी हे पिकांसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. त्यांच्यादृष्टीने पावसाचा ऋतू अत्यंत महत्त्वाचा असतो. राज्यातील पर्जन्यमानाची टक्केवारी किती असते यावर वर्षभरातील शेतीचे गणित अवलंबून असते.