Mla Suresh Dhas Son Car Accident : आष्टीहून पुण्याकडे निघालेल्या आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. नितीन शेळके यांचा जागीच मृत्यू झाला असून, अपघात सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे.

अहिल्यानगर : आष्टीहून पुण्याकडे निघालेल्या आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात नितीन शेळके (वय अंदाजे ३५) यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना रात्री साडेदहा ते अकरा दरम्यान अहिल्यानगर-पुणे महामार्गावर घडली.

अपघात नेमका कसा घडला?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आमदार सुरेश धस यांचे सुपुत्र सागर धस हे आपल्या चारचाकी वाहनाने आष्टीहून पुण्याच्या दिशेने जात होते. याच दरम्यान, रस्त्यावरून जात असलेल्या नितीन शेळके यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक बसली. धडक इतकी जबरदस्त होती की शेळके यांना जागीच प्राण गमवावे लागले.

सुपा पोलिसांकडून तपास सुरू

हा अपघात सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला असून, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहन सुपा पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, वाहन चालवणारा नेमका कोण होता, याबाबत सध्या चौकशी सुरू आहे.

गाडी कोण चालवत होतं?

या गाडीचे मालक आमदार सुरेश धस यांचे पुत्र सागर धस असल्याचे स्पष्ट झाले असले, तरी अपघाताच्या वेळी गाडी चालवत नेमका कोण होता, हे अद्याप पोलिसांनी जाहीर केलेले नाही. मात्र सागर धसच वाहन चालवत होते, अशी जोरदार चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.

अपघातानंतरचा गोंधळ

या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत नितीन शेळके यांना उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात येत असतानाच त्यांनी प्राण सोडले. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातही उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेषतः सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले सुरेश धस यांचे नाव पुन्हा एकदा प्रचंड गाजते आहे.

हा अपघात केवळ एक ट्रॅफिक दुर्घटना न राहता, राजकीय दृष्टिकोनातूनही संवेदनशील ठरू शकतो. पोलिसांचा तपास पुढे काय वळण घेतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.