MHT-CET 2026 निकालात कथित घोटाळा झाल्याचा आरोप पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काँग्रेसचे सचिन सावंत आणि आमदार रोहित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे महादेव बालगुडे यांनी एका शिक्षकाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

मुंबई : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. अशातच आता महाराष्ट्रातील एमएच सीईटी (MHT-CET 2026) परीक्षेच्या निकालावरून नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत, आमदार रोहित पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महादेव बालगुडे यांनीही एमएच सीईटी निकालात कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे.

नीटनंतर आता एमएच सीईटीवरही संशय

देशभरात नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्याविरोधात झालेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्याच पार्श्वभूमीवर आता एमएच सीईटीच्या निकालावरूनही विरोधकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

काँग्रेसचे सचिव सचिन सावंत यांनी सर्वप्रथम एमएच सीईटीमध्ये कथित घोटाळ्याचा आरोप केला. त्यांनी म्हटले की, बारावीत 35 ते 40 टक्के गुण मिळालेल्या काही विद्यार्थ्यांना एमएच सीईटी मध्ये 90 ते 100 पर्सेंटाईल कसे मिळाले, असा सवाल उपस्थित केला. सचिन सावंत यांनी निकालाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनीही सरकारवर निशाणा साधला.

महादेव बालगुडेंची पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महादेव बालगुडे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'एक्स' (X) हँडलवर एका शिक्षकाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या 30 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये एमएच सीईटीच्या निकालात कथित गैरव्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

पोस्टमध्ये बालगुडे यांनी म्हटले आहे की, “हे स्वतः शिक्षक आहेत. एमएच सीईटी घोटाळा कसा झाला, यावरील त्यांचा संपूर्ण व्हिडिओ पाहा. पत्रकार आणि शिक्षकांसारखे अराजकीय लोक पुराव्यांसह बोलतात, तेव्हा जनतेचा विश्वास बसतो. हा मुद्दा सर्वप्रथम काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला होता.”

Scroll to load tweet…

व्हिडिओमधील दावा

शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये मेरिटनुसार विद्यार्थ्यांना रँक न मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच परीक्षा प्रक्रिया आणि परीक्षा सेलच्या कार्यपद्धतीवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मात्र या सर्व आरोपांची अधिकृतरीत्या पुष्टी झालेली नाही. संबंधित यंत्रणेकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देखील आलेली नाही. या प्रकरणात चौकशी करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.