- Home
- Maharashtra
- MHADA Lottery 2026 : घर खरेदीदारांसाठी दिलासादायक बातमी! कोकण मंडळाची 2,000 पेक्षा जास्त घरांची लॉटरी जाहीर होणार
MHADA Lottery 2026 : घर खरेदीदारांसाठी दिलासादायक बातमी! कोकण मंडळाची 2,000 पेक्षा जास्त घरांची लॉटरी जाहीर होणार
MHADA Lottery 2026 : म्हाडा कोकण मंडळाअंतर्गत कल्याण, डोंबिवली, आणि ठाणे परिसरात 2,000 हून अधिक घरांची लॉटरी जाहीर करणार आहे. या लॉटरीची जाहिरात फेब्रुवारी 2026 मध्ये प्रसिद्ध होईल आणि एप्रिल-मे महिन्यात सोडत निघेल.

घर खरेदीदारांसाठी दिलासादायक बातमी!
MHADA Lottery 2026 : स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) लवकरच कोकण मंडळाअंतर्गत 2,000 हून अधिक घरांची सोडत जाहीर करणार आहे. कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि घोटेघर या भागांमध्ये ही घरे उपलब्ध होणार असून, घर खरेदीसाठी इच्छुक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
फेब्रुवारीत जाहिरात, एप्रिल–मे मध्ये लॉटरी
मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून फेब्रुवारी 2026 मध्ये घरांच्या लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे, तर एप्रिल किंवा मे महिन्यात प्रत्यक्ष सोडत प्रक्रिया पार पडणार आहे. मुंबई व उपनगरांमध्ये घरांच्या किंमती प्रचंड वाढल्याने सामान्य नागरिकांसाठी घर घेणं अवघड झालं आहे. अशा परिस्थितीत ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीसारख्या शहरांमधील म्हाडाची घरे अनेकांसाठी आशेचा किरण ठरत आहेत.
खासगी विकासकांचा कोटा आणि PMAY घरांचा समावेश
या लॉटरीमध्ये खासगी विकासकांकडून म्हाडाला मिळणाऱ्या 15% आणि 20% आरक्षित घरांचा, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) उपलब्ध होणाऱ्या घरांचा समावेश असणार आहे. त्यामुळे अल्प व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घर घेण्याची मोठी संधी निर्माण होणार आहे.
मागील अनुभव पाहता मोठ्या प्रतिसादाची शक्यता
कोकण मंडळाच्या ठाणे आणि कल्याण परिसरातील घरांना नेहमीच प्रचंड मागणी असते. 2025 मध्ये 5,000 घरांसाठी तब्बल 1.5 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. त्यामुळे यंदाही या लॉटरीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई मंडळाची लॉटरी रखडली होती
दरम्यान, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ऑक्टोबरमध्ये लॉटरी जाहीर होण्याची अपेक्षा होती. मात्र, पुरेशी घरे उपलब्ध नसल्यामुळे ती लॉटरी पुढे ढकलण्यात आली होती. यामुळे अनेक इच्छुक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. अशा पार्श्वभूमीवर कोकण मंडळाची ही लॉटरी घर खरेदीदारांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

