गणेशोत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी पुणे मेट्रो रात्री २ वाजेपर्यंत चालवण्यात येणार आहे. विसर्जनाच्या दिवशी ४१ तास मेट्रो सेवा सुरू राहणार असून, जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मार्गावरील मेट्रो पहिल्यांदाच सुरू राहणार आहे.

पुणे: संपूर्ण राज्यात गेल्या दहा दिवसांपासून गणेशउत्सवाचा आनंद पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या काळात पुणे आणि मुंबईला भाविकांनी मोठ्या प्रमाणावर भेट दिल्याचं दिसून आलं आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन, त्यांच्या सोईसाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशने (महामेट्रो) (Pune Maha Metro) गणेशोत्सवाच्या काळामध्ये पहाटे दोनपर्यंत मेट्रो सेवा (Pune Maha Metro) सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच विसर्जनाच्या दिवशी सलग 41 तास मेट्रो सेवा सुरू राहणार आहे.

जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो सुरु राहणार 

त्यामुळं भाविकांना रात्री आणि पहाटे प्रवास करणे सोपं जाणार आहे. पुण्यातील गणोशोत्सव मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. येथील ५ मानाच्या गणपतींना पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक येथे येत असतात. यावर्षी पहिल्यांदाच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रो सुरु राहणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

ही मेट्रो सेवा मानाच्या गणपतींच्या जवळून जाणार आहे. कसबा, मंडई आणि स्वारगेट ही स्थानके सुरु करण्यात आली आहेत. प्रवाशांना मेट्रोने प्रवास केल्यामुळे त्यांच्या वेळेमध्ये बचत होणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील मंडई, कसबा या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मंडई येथे एका बाजूला प्रवेश आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडण्याची सोय करण्याचे नियोजन आहे.

कोणती वेळ वाढवण्यात आली? 

अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच ६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजेपर्यंत मेट्रो सेवा सलग ४१ तास चालू राहणार आहे. तसेच २७ ते २९ ऑगस्ट या गणेशोत्सवाच्या पहिल्या तीन दिवसांत मेट्रो सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत धावेल. त्यानंतर ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या काळात मेट्रो सेवा सकाळी ६ पासून रात्री २ वाजेपर्यंत सुरू राहील.