Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील आजपासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू करणार आहेत. सरकारसोबत झालेल्या चर्चेत कोणताही निर्णय न झाल्याने त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. हैदराबाद गॅझेट, कुणबी प्रमाणपत्र आणि मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांवर ते ठाम आहेत.

Manoj Jarange Patil Protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. सरकारच्या शिष्टमंडळाने काल त्यांची भेट घेत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांना जरांगेंची समजूत काढण्यात अपयश आले. चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने जरांगे आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

सरकारसोबतची चर्चा ठरली निष्फळ

29 मे रोजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जवळपास दीड तास मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी कुणबी दाखले, हैदराबाद गॅझेट आणि मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसंदर्भात जरांगेंनी प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र या चर्चेत कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही.सरकारला यापुढे आणखी वेळ देणार नसल्याचे स्पष्ट करत जरांगे यांनी आंदोलनाची भूमिका कायम ठेवली आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून आंतरवाली सराटी येथे त्यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे.

मनोज जरांगे यांच्या प्रमुख 10 मागण्या

मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसमोर 10 महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या आहेत.

प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :

1. मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मेपूर्वीच्या नोंदींनुसार कुणबी प्रमाणपत्र द्यावे. 

2. सातारा, कोल्हापूर, औंध, पुणे आणि मिरज संस्थानांबाबत 1994 च्या धर्तीवर GR काढावा. 

3. आंदोलनादरम्यान दाखल सर्व गुन्हे मागे घ्यावेत. 

4. आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरी द्यावी. 

5. सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू कराव्यात. 

6. महामंडळाचे थकीत परतावे तातडीने वितरित करावेत. 

7. दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांना तातडीने व्हॅलिडिटी द्यावी. 

8. मराठा उपसमिती बरखास्त करावी. 

9. स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करावे. 

10. शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासणी सुरू ठेवावी.

कोल्हापुरातून आंदोलनाला समर्थन

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या चरणी उभे राहून आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी सातारा गॅझेटप्रमाणेच कोल्हापूर गॅझेटचाही आरक्षण प्रक्रियेत समावेश करावा, अशी मागणी केली जाणार आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला

मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणामुळे राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सरकार आणि आंदोलक यांच्यातील चर्चेत अद्याप कोणताही मार्ग निघालेला नसल्याने पुढील काही दिवस राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.