मालेगावमध्ये पार्टीसाठी गेलेल्या २४ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाली आहे. रविवारी सकाळी दरेगाव हिल टेकडीजवळ त्याचा मृतदेह सापडला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मालेगाव: मालेगावमधून एक खळबळजनक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पार्टीसाठी मित्रांसोबत गेलेल्या २४ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. मोहम्मद तारीक असं या मृत तरुणाचं नाव असून, तो मालेगाव तालुक्यातील पवारवाडी परिसरातील रहिवासी होता.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

शनिवारी सायंकाळी मोहम्मद आपल्या मित्रांसोबत पार्टीसाठी बाहेर गेला होता. मात्र रात्रभर घरी न परतल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. त्यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली आणि मित्रांकडेही चौकशी केली. तरीही त्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही. अखेर रविवारी सकाळी दरेगाव हिल टेकडीजवळील एका निर्जनस्थळी त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला.

हत्या तीव्र हत्याराने, संशयांचे सावट

तारीकच्या शरीरावर तीव्र धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळून आले असून, त्याची अत्यंत निर्दयपणे हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तारीकची कुणाशी अद्वात होत होती का, त्याचं कोणाशी वाद-विवाद होते का, याचीही चौकशी केली जात आहे. सध्या आरोपी कोण, आणि हत्या नेमकी का झाली यावर अजूनही स्पष्टता नाही.

पोलिसांकडून सर्व शक्यतेचा तपास सुरू

या घटनेने मालेगाव शहर हादरले असून, परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि मित्रमंडळींकडून चौकशी करत तपासाची चक्रे गतीने फिरवली जात आहेत.