राज्यातील शाळा विद्यार्थ्यांनी गजबजल्या, शाळांमध्ये केले विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

| Published : Jun 15 2024, 12:07 PM IST

school opening first day

सार

राज्य सरकारच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आजपासून सुरू होत आहेत. सर्वच शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे.

राज्य सरकारच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आजपासून सुरू होत आहेत. सर्वच शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यात अडीच हजार सरकारी तर 500 हून अधिक खाजगी शाळा सुरु होणार आहेत. चिमुकल्यांची पावले शाळेकडे वळताना थोडीशी अडखळत होती. मात्र, बऱ्याच दिवसांनी पावलं शाळेकडे वळल्याने आपल्या आवडत्या शिक्षकांना, मित्रांना भेटण्याची उत्सुकता सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होती.

धाराशिवमधील नूतन प्राथमिक शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत केलं. दारावर तोरण, स्वागताची सुबक रांगोळी काढून स्वागताची तयारी केली. मुले शाळेत येताच गोड जिलेबी खाऊ घालून तोंड गोड केलं. भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा ठेवा जपत केळी खांब,पताका,फुलांच्या माळा आणि फुग्यांनी सजवलेल्या बैलगाडीच्या रथातून विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉइंट देखील तयार करण्यात आला होता. फोटो काढण्यासाठी विद्यार्थी शिक्षकांनी गर्दी केली.

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 50 हजार 317 पुस्तकांचे संच उपलब्ध झाले आहेत. संस्थेचे अध्यक्षांनी गुलाब पुष्प आणि चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळेच्या मुख्याध्यापिकांनी विद्यार्थ्यांचं औक्षण केलं.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 1360 शाळा विद्यार्थ्यांनी गजबजल्या आहेत. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविणे उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 51 हजार 546 विद्यार्थ्यांना मिळून 58 हजार 724 पुस्तकांचे वितरण होणार आहे. विविध शाळांतून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आल्यामुळे सारेच विद्यार्थी भारावून गेले.