सार
भारतीय हवामान विभागाने ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मान्सून मुंबईमध्ये दाखल झाल्यापासून पावसाची रिमझिम सुरुच आहे. राज्यातही पावसाने चांगलाच जोर धरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात मान्सून व्यापायला अजून दोन दिवस लागणार असल्याची अपेक्षा आहे. राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता कायम आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यासह कोकणात पुढील 4 दिवस पावसाच्या सरी पाहायला मिळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यांना यलो अलर्ट
भारतीय हवामान विभागाने, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांना आयएमडीने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. याशिवाय राज्यभरात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज कायम आहे.
विदर्भातही जोरदार पावसाचा अंदाज
विदर्भातील अनेक जिल्ह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिय, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयएमडीने विदर्भातील काही जिल्ह्यांना पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट दिला आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
या जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळणार
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, पुणे, पालघर, अहमदनगर, सातारा, धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.
विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, 50-60 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.