सार
Vidarbha Rain Update : पूर्व विदर्भात कोसळणार्या धुव्वाधार पावसाने अनेक जिल्ह्यांना धो- धो धुतलं असून भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहे.
Vidarbha Rain Update : राज्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये रविवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. अशातच गेल्या दोन दिवसांपासून पूर्व विदर्भात कोसळणार्या धुव्वाधार पावसाने भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर इत्यादि जिल्ह्यांना धो- धो धुतलंय. अजून देखील काही भागात पावसाचा जोर कायम असून संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्यावतीने केले आहे.
प्रशासनाने नदीकाठच्या ग्रामस्थांना दिले सतर्क राहण्याचा आदेश
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या विसर्गात रविवारी सकाळी पुन्हा एकदा वाढ केली आहे. धरणाचे सर्व 33 गेट पुन्हा एकदा उघडण्यात आले आहे. 7 गेट 1 मीटरने उघडण्यात आले असून 26 गेट हे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. धरणातून सध्या 1 लाख 55 हजार 559 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, रविवारी भंडारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला असून नदीकाठावरील ग्रामस्थांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
मुसळधार पावसाने जिल्हा सामान्य रुग्णालयाला गळती
रविवारी सकाळपासून भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. याचा परिणाम भंडारा शहरातील सखल भागामध्ये जलमयस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातही जलमयस्थिती बघायला मिळत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या काही वर्षांपूर्वीच बांधण्यात आलेल्या कोरोना बिल्डिंगच्या छतालाही गळती लागली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना इथे राहण्याची व्यवस्था नसल्याने आयसीयु वार्डाच्या वर्हांड्यात थांबतात. मात्र मुसळधार पावसामुळे आयसीयु वार्डाच्या वर्हांड्यात गळती होत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनाही राहण्याचा आता प्रश्न उपस्थित झाला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाला पाण्याने वेढलं
जिल्हा सामान्य रुग्णालयाला पूर्णपणे पाण्याने वेढल्याचेही चित्र आहे. अक्षरश: गुडघाभर पाण्यातून रुग्णांच्या नातेवाईकांना या रुग्णालयामध्ये जावे लागत असल्याचे विदारक चित्र बघायला मिळत आहे. येथील बांधकाम संपूर्ण दोषपूर्ण असून संबंधित कंत्राटदार आणि तांत्रिक सहमती देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रहार संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी यांनी केली आहे.
अनेकांच्या घरात शिरलं पाणी
भंडाऱ्यात रविवारी सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे भंडारा शहरातील अनेक सखल भागांमध्ये पावसाचे पाणी शिरले असून अनेक घरांमध्ये जलमयस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा शहरातील खात रोड मार्गावरील रुक्मिणीनगर, सहकारनगर, केसलावडा, भोजापूर, अंबिका नगर, आंबेडकर वार्ड यासह शहरातील अनेक सखल भागातील रस्त्यांवरून पाणी वाहत आहे. अनेकांना पुन्हा एकदा पुराची धडकी बसली असून नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे.
आणखी वाचा :
आमदारांच्या शपथविधीचे व्हिडीओ व्हायरल, जाणून घ्या नेमकं कोण काय काय म्हणाले?