“मान झुकवायचीच असेल तर दिल्लीऐवजी रायगडावर…”, रोहित पवार यांची पोस्ट चर्चेत

| Published : Jun 06 2024, 03:04 PM IST

Rohit pawar

सार

रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर रोहित पवारांनी ही पोस्ट केली आहे.

 

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपाला त्यांची ३०० जागाही एनडीएसह जिंकता आलेल्या नाहीत. महाराष्ट्रात भाजपाचं अक्षरशः पानिपत झालं आहे. कारण २०१९ ला २३ जागा जिंकणाऱ्या भाजपाला यावेळी अवघ्या ९ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. अशात बारामतीची हाय व्होल्टेज निवडणूकही महायुतीला जिंकता आलेली नाही. त्यानंतर आरोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. आज शिवराज्याभिषेक दिन आहे त्या निमित्ताने रोहित पवारांनी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ''मान झुकवायचीच असेल तर दिल्लीऐवजी इथं रायगडावर झुकवा! असे कॅप्शन देऊन ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं आणि स्वराज्याच्या या छत्रपतींच्या समाधीसमोर नतमस्तक झालो. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देशभरातून आलेले असंख्य शिवभक्त उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांनी दिलेले विचार जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि आपली पिढी हे विचार जपतील, जगतील आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवतील, असा विश्वास आहे. सर्वांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या लाख लाख शुभेच्छा!'' अशी पोस्ट केली आहे. यात किल्ले रायगडावरील शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाल्याचे फोटो पोस्ट केले आहेत.