Maharashtra Rain Update : राज्यासह पुण्यात पुढील 3 दिवस दमदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

| Published : Jul 09 2024, 07:19 PM IST

Rain

सार

Maharashtra Rain Update : राज्यातील बहुतांश भागात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. तर पुढील तीन दिवस राज्यासह पुण्यात चांगल्या पावसाचा अंदाज पुणे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

 

Maharashtra Rain Update : राज्यातील बहुतांश भागात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. तर रविवारच्या रात्रीपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे सर्वत्र एकच दाणादाण उडवत जनजीवन विस्कळीत केल्याचे बघायला मिळाले आहे. असे असताना पुढील तीन दिवस राज्यासह पुण्यात चांगल्या पावसाचा अंदाज पुणे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

खास करून कोकण भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील डोंगर माथ्यांवर चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. संभाव्य पावसाचा इशारा लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन ही हवामान विभाग आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

यंदा समाधानकारक पाऊस

अलिकडे झालेल्या पावसामुळे शेतकरी राजा देखील काहीसा सुखवलेला आहे. तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर पूर्व विदर्भात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षाच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कुठे अतिवृष्टी तर कुठे पावसाने दांडी दिल्याने बळीराजा मोठ्या विवंचनेत सापडला आहे. गेल्या वर्षी अल निनोचा परिणाम होता. त्यामुळे समाधानकारक पाऊस झाला नाही. मात्र यावेळेस आनंदाची बातमी आहे ती म्हणजे अल निनो पश्चिम उपसागरात तयार होण्याची शक्यता आहे. ज्याच्यामुळे चांगला पाऊस आपल्याला मिळू शकतो. अशी दिलासादायक शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

घाट माथ्यावर जाताना सतर्कता बाळगावी

सोमवारी वर्तवण्यात आलेला अंदाज हा फक्त तीन तासांसाठी आणि विशेषत: शहरासाठी वर्तवण्यात आला होता आणि ऑरेंज अलर्ट हा पुणे शहरासाठी नाही तर फक्त घाटमाथा परिसरासाठी वर्तवण्यात आला होता, अस स्पष्टीकरण ही हवामान खात्याने दिलेले आहे. परिणामी, अजूनही घाट माथ्यावर जाताना सतर्कता बाळगावी, अस आवाहन हवामान खात्याने केले आहे.

हजारो शेतकर्‍यांना अतिवृष्टीचा फटका, बळीराजा पुन्हा हवालदिल

बुलढाणा जिल्ह्यात सोमवारी दिवसभर झालेल्या पावसाने कहरच केला आहे. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील 17 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने जवळपास 11 हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. तर पंधरा हजार शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे शेती साहित्य सुद्धा वाहून गेला आहे. त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यातील मोताळा, खामगाव, नांदुरा आणि शेगाव या चार तालुक्यात सोमवारी दिवसभर पाऊस कोसळला. सर्वात जास्त पाऊस खामगाव तालुक्यातील आवार या महसूल मंडळात 219.3 मिलिमीटर पाऊस कोसळला. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती असून शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला आहे.

आणखी वाचा

IAS पूजा खेडकर यांची वाशिमला केली उचलबांगडी, सरकारी अधिकार वापरून ऑफिसही बळकावले