उद्धव ठाकरे यांनी खासदारांची आज तातडीची बैठक बोलावली आहे. पक्षातील एकजूट कायम ठेवणे आणि सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर चर्चा करणे हा बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पक्षाकडून कोणत्याही प्रकारच्या फूट किंवा पक्षांतराच्या चर्चांना अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. कारण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे काही खासदार शिंदे गटात जाणार असल्याचा दावा केला जात आहे. आज उबाठाचे प्रमुख Uddhav Thackeray यांनी खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. मातोश्रीवर ही बैठक होत असून काही खासदार बैठकीला उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. पण काही खासदार नॉट रिचेबल असल्याची माहिती ही पुढे आली आहे. उबाठा शिवसेना पक्षाचे काही खासदार खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगत आहेत. ज्याला ऑपरेशन टायगर असे नाव दिल्याचे देखील म्हटले जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या खासदारांसोबत चर्चा सुरु केल्याची माहिती आहे.

मातोश्रीवर खासदारांची बैठक
शिवसेना (UBT) ने मात्र ही नियमित संघटनात्मक बैठक असल्याचे सांगितले आहे. पक्षातील काही नेत्यांची नाराजी यामुळे विरोधकांकडून खासदारांना आपल्या गटात शामिल करुन घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. पक्षात मोठी हालचाल होण्याच्या दाव्यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांसोबत चर्चा करून पुढील राजकीय दिशा स्पष्ट करण्याचा प्रयत्न या बैठकीत होण्याची शक्यता आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात काय भूमिका घ्यावी याबाबत ही चर्चा होऊ शकते.
येत्या आठवड्यात खासदार फुटणार?
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे काही खासदार शिंदे गटात जाणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी येत्या आठवड्याचा मुहूर्त देखील ठरल्याची माहिती पुढे येत आहे. 6-7 दिवसात हे खासदार शिंदे गटात येतील असा दावा केला जात आहे. लोकसभेत ठाकरे गटाचे 9 तर शिंदे गटाचे 7 खासदार आहेत. जर 2 खासदार शिंदे गटात गेले तर शिंदे गटाची ताकद वाढणार आहे.
