नागपूरकरांना दिलासा देणारी बातमी, तोतलाडोह 50 टक्के भरलेलं तर इतर धारणांत पुरेसा पाणीसाठा

| Published : May 18 2024, 01:28 PM IST

totladoh dam

सार

नागपूरकरांची तहान भागावणाऱ्या धारणांसह इतर सर्व धारणांमध्येही पुरेसा पाणीसाठा असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. त्यामुळे नागपूरकरांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.

नागपूरकरांची तहान भागावणाऱ्या धारणांसह इतर सर्व धारणांमध्येही पुरेसा पाणीसाठा असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. त्यामुळे नागपूरकरांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. राज्यासह विदर्भातील बहुतांश भागात पाणी टंचाईचे भीषण सावट असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे अनेक धारणांमधील पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. राज्यात मान्सून दाखल होईपर्यंत पाण्याचे संकट आणखी गडद होण्याची भीती देखील वर्तविण्यात येत आहे. अशातच नागपूकरांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.

तोतलाडोह धरणात ऐन उन्हाळ्यात देखील 50 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नागपूरकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही, हे जवळ जवळ निश्चित झाले आहे. मान्सून केरळात 31 मे ला दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाजही भारतीय हवामान विभागाने या आधीच वर्तवला आहे. गेल्या वेळी राज्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने सर्वत्र पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे. अनेक मोठ्या धरणांचीही पाणीपातळी खालावली आहे. तर गावच्या टाक्यांमध्येही पाणी दिसेना झालं आहे. नळातून पाणी येण्यासाठी 8 ते 10 दिवसांची वाट पाहावी लागत आहे. हे चित्र विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत बघायला मिळत आहे. असे असताना नागपूरकरांना काहीसा दिलासादायक बातमी समोर आली आहे.

तोतलाडोह 50 टक्के भरलेलं

नागपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोहमध्ये आजच्या स्थितीला 50 टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा पाणीसाठा 10 टक्क्यांनी कमी असला तरी नागपूरची तहान भागणार असल्याने चिंता नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तोतलाडोह धरणाची क्षमता 1016 दशलक्ष घन मीटर आहे. जिल्ह्यातील पाच मोठ्या धरणांची स्थिती उन्हाळ्यातही चांगली असल्याची माहिती पुढे आली आहे, असे पेंच पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

काय सांगते आकडेवारी?

तोतलाडोह, खिंडसी आणि कामठी खैरी जलाशयातही सध्याच्या घडीला पुरेसा जलसाठा शिल्लक आहे.

आजच्या तारखेत पेंच नदीवरील तोतलाडोह जलाशयात 50 टक्के इतका जलसाठा आहे.

गेल्यावर्षी हे प्रमाण 59 टक्क्यांपर्यंत होते.

नवेगाव खैरीमध्येही 94 टक्के पाणीसाठा असून गेल्यावर्षी याच काळात या जलाशयात 71 टक्के साठा होता.

खिंडसी जलाशयात 60 टक्के, तर वडगाव जलाशयात 45 टक्के जलसाठा उपलब्ध आहे.