Election Commission Maharashtra: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार होणार आहेत. 

Election Commission Maharashtra: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा झाली आहे. २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत या निवडणुकीचे वेळापत्रक स्पष्ट केले. या घोषणेसह राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचे वातावरण तापले आहे.

निवडणुकीचं वेळापत्रक (Election Schedule)

राज्यातील या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ३१ जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण करायच्या आहेत. त्यानुसार आयोगाने पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर केल्या आहेत.

टप्पा तारीख

अर्ज दाखल करण्याची सुरुवात १० नोव्हेंबर २०२५

अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५

अर्ज छाननी १८ नोव्हेंबर २०२५

अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर २०२५

अपील नसलेल्या ठिकाणी अंतिम यादी २५ नोव्हेंबर २०२५

निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी २६ नोव्हेंबर २०२५

मतदानाचा दिवस २ डिसेंबर २०२५

मतमोजणीचा दिवस ३ डिसेंबर २०२५

निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा!

गेल्या काही वर्षांपासून या निवडणुका ओबीसी आरक्षण आणि तांत्रिक कारणांमुळे रखडल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आयोगाने अखेर तयारी पूर्ण करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना हिरवा कंदील दाखवला आहे. राज्यातील अनेक नगरपरिषद आणि नगरपंचायतींचा कार्यकाळ संपल्याने नागरिकांनाही नव्या प्रतिनिधींची प्रतीक्षा होती.

व्हीव्हीपॅटचा वापर होणार नाही

या निवडणुकांत व्हीव्हीपॅट (VVPAT) प्रणालीचा वापर न करता पारंपरिक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे (EVM) मतदान घेतले जाणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

राजकीय हालचालींना वेग

या घोषणेनंतर राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आपली तयारी झपाट्याने सुरू केली आहे. विरोधकांनी मतदार याद्यांतील घोळांवर आक्षेप घेतला असला, तरी आयोगाने निवडणुका वेळेत घेण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

महत्त्वाचं

राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतींचा कार्यकाळ संपला आहे.

निवडणुका तीन वर्षांपासून रखडल्या होत्या.

पहिला टप्पा जाहीर, पुढील टप्प्यांचा कार्यक्रम लवकरच घोषित होणार.