मराठा आरक्षणासाठी 4 जूनला मनोज जरांगे पुन्हा उपोषण करणार!

| Published : May 14 2024, 03:13 PM IST / Updated: May 14 2024, 08:24 PM IST

manoj jarange patil

सार

मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी येत्या 4 जूनला उपोषणाला बसणार आहेत अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे. येत्या चार जूनला जरांगे नारायण गडावर सभा घेणार आहेत. त्यानंतर चार जूनला ते उपोषणाला बसणार आहेत.

मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी येत्या 4 जूनला उपोषणाला बसणार आहेत अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे. येत्या चार जूनला जरांगे नारायण गडावर सभा घेणार आहेत. त्यानंतर चार जूनला ते उपोषणाला बसणार आहेत. चार जून हा मुहूर्त वगैरे काही नाही. स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात आम्हाला आनंद आहे, असं यावेळी जरांगे यांनी सांगितले आहे.

4 जूनला सकाळी नऊ वाजता त्यांचे उपोषण सुरू होणार आहे. या लढ्यात सामील होण्यासाठी माझ्या समाजाला आवाहन करायची गरज नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये मी नाही. आम्ही कुणाचा प्रचार केला नाही. कुणाला निवडून आणण्याचेही आम्ही आवाहन केलेले नाही. आमचा महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठिंबा नव्हता. मी फक्त उमेदवारांना पाडण्याचे आवाहन केले. कोणाला पाडायचे हे मराठा समाजाल कळालेलं आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहे.

...तर 288 जागांवर सर्व जाती-धर्माचे लोक निवडणूक लढवणार

मी कुणालाच पाठिंबा दिलेला नाही. मी कुणालाच पाठींबा देत नाही. नोकरदारांची पदोन्नती होत नाही. दहा टक्के आरक्षण लोकांच्या कामाचे नाही. आता सामान्य मराठ्यांना वाटायला लागलंय की भरत्या थांबल्या आहेत. विधानसभेत गणित बिघडवणार नाही. मैदानातच मी राहणार आहे. सगे-सोयऱ्याची अंमलबजावणी करायला हवी. मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा पारित केला नाही तर मी मैदानात उतरणार आहे. फडणवीस शिंदे यांना आवाहन आहे की, आमच्या हक्काचं आम्हाला द्या. दिलं नाही तर 288 जागांवर आम्ही सर्व जाती-धर्माचे लोक निवडणूक लढवणार आहोत, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

दलित, मुस्लीम, धनगरांबद्दल द्वेष

पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात कधीच आले नव्हते. मात्र आता मोदी गोधड्यांसहित येथे आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या दहा वर्षांत माध्यमांना कधीच बोलले नाहीत. आता मात्र ते माध्यमांसमोर बोलत आहेत. पूर्वी ते कुणाचाच प्रचार करत नव्हते. मात्र ते आता सगळ्यांचा प्रचार करायला लागले आहेत. ही वेळ भाजपच्या काही मोजक्या नेत्यांवर आली आहे. या सगळ्या परिस्थितीला भाजपचे पाच स्थानिक नेते जबाबदार आहेत. या लोकांना बारा बलुतेदार, दलित, मुस्लीम, धनगरांबद्दल द्वेष आहे, असा आरोप जरांगे यांनी केला आहे.