सार

ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अकाळी पावसाने अक्षरश: धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. पुण्यातही आज जोरदार पाऊस पडला आहे. त्याचबरोबर सांगलीच्या वाळवा तालुक्यातील काही भागांना वादळी वारा आणि गारपिटीसह पावसाने झोडपले आहे.

ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अकाळी पावसाने अक्षरश: धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. पुण्यातही आज जोरदार पाऊस पडला आहे. त्याचबरोबर सांगलीच्या वाळवा तालुक्यातील काही भागांना वादळी वारा आणि गारपिटीसह पावसाने झोडपले आहे. बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून सतत दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसतोय. विशेष म्हणजे ऐन उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावरही त्याचा परिणाम झाला असून विशेष म्हणजे हा पाऊस पुढचे आणखी दोन दिवस महाराष्ट्रात मुक्काम करण्याची शक्यता आहे.

‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता?

पुणे जिल्ह्यासाठी आज हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला होता. पण पुढच्या दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढच्या दोन दिवसांमध्ये पुण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यात 11 आणि 12 मे या दोन दिवशी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 13 आणि 14 तारखेसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात 12 मे या तारखेसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नांदेड, लातूर, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी देखील 12 तारेखासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या वेळी वाऱ्याचा वेग हा 40 ते 50 किमी प्रतितास असा असण्याची शक्यता आहे.