महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार प्रवेश केला असून, मुंबई, पुणेसह अनेक भागात पाऊस पडत आहे. पुढील २४ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मान्सूनने कोकणात दमदार प्रवेश केला असून, त्यामुळे मुंबई, पुणे, कोकण आणि राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस अतिशय महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले आहे. या कालावधीत शेतकरी आणि चाकरमानी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असा इशारा दिला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

पुढील २४ तास महत्त्वाचे, कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता

हवामान खात्याच्या माहितीनुसार, आगामी २४ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सून आणखी सक्रिय होऊन महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कालपर्यंत (२५ मे) मान्सून रत्नागिरी जिल्ह्यातील देवगडपर्यंत पोहोचला होता आणि आता तो मुंबईपर्यंत दाखल झाल्याचे निदर्शनास आले आहे.

कोणत्या भागांमध्ये पडणार पाऊस?

सध्या कोकणासह मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर अशा अनेक भागांत पावसाने आगमन केले आहे. हवामान विभागानुसार, पुढील चार ते पाच दिवस कोकणासह घाटमाथ्यावरील भागांमध्ये आणि पुणे जिल्ह्यात चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

मुंबईत आज पुन्हा एकदा पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. अनेक रेल्वे स्थानकांवरील रुळ पाण्याखाली गेले आहेत. भुयारी मेट्रोमध्येही पाणी साचले असून, प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी योग्य ती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला

पावसाच्या या तडाख्यामुळे शहरातील दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत आहे, तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनीही योग्य नियोजन करून शेतीची कामे हाती घ्यावीत. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पावसाचा जोर लवकरच आणखी वाढू शकतो.

पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रासाठी हवामानाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहेत. नागरिकांनी आणि प्रशासनाने सज्ज राहणे गरजेचे आहे. पावसाचे अचूक भाकीत आणि योग्य खबरदारीमुळे संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते.