परभणी जिल्ह्यातील झरी गावात साक्षी चंद्रप्रकाश लाटे हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. पती, सासू-सासरे आणि दीर-जाऊ यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप आहे. भरोसा सेलकडे मदत मागूनही न्याय मिळाला नाही.

परभणी: पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची मालिका थांबायला तयार नाही. आधी वैष्णवी हगवणे, त्यानंतर भक्ती गुजराथी आणि आता साक्षी चंद्रप्रकाश लाटे या विवाहितेनेही सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यातून समोर आली आहे. या घटनांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असून, पुरोगामीत्वाचा बुरखा फाटल्याचेच चित्र दिसत आहे. महाराष्ट्रात नेमकं घडतंय तरी काय, हा प्रश्न आता विचारला जात आहे.

काय आहे साक्षीच्या आत्महत्येचं प्रकरण?

परभणी जिल्ह्यातील झरी गावात राहणाऱ्या साक्षी चंद्रप्रकाश लाटे (वय २४) हिचा विवाह १२ डिसेंबर २०२२ रोजी चंद्रप्रकाश लाटे याच्याशी झाला होता, जो एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. लग्नानंतर काही दिवसांतच साक्षीला तिची सासू प्रमिला लाटे आणि सासरे भिकुदास लाटे यांनी मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. स्वयंपाक नीट येत नाही, काम व्यवस्थित करत नाही, अशा किरकोळ कारणांवरून तिला सतत छळले जात असे.

एवढेच नाही तर, पती चंद्रप्रकाश हा दारू पिऊन तिला मारहाण करत असे आणि तिच्या चारित्र्यावरही संशय घेत होता. तो तिला आई-वडिलांशी बोलूही देत नव्हता. या त्रासाला कंटाळून साक्षी माहेरी निघून आली होती.

भरोसा सेलकडे मदत मागूनही पदरी निराशाच!

साक्षीने पती-पत्नीत समेट घडवण्यासाठी भरोसा सेलकडे अर्जही दिला होता. मात्र, यामुळे तिला उलट अधिक त्रास सहन करावा लागला. नवऱ्याने तिला "तू पोलिसांकडे का गेलीस?" असे विचारून अधिक त्रास दिला. तो "मी एमपीएससी करतोय, मला नोकरी लागणार आहे, मी तुला घेऊन जाणार आहे," अशी धमकी देत तिचा मानसिक छळ करत होता.

साक्षीच्या वडिलांनी तिला नांदायला घेऊन जाण्यासाठी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्यांसह कुटुंबीयांची समेट घडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचाही काही फायदा झाला नाही. उलट, सासरच्या लोकांनी साक्षीला फोनवरून त्रास देण्यास सुरुवात केली.

शेवटी टोकाचं पाऊल...

२१ मे रोजी सायंकाळी साक्षीने पतीसोबत फोनवर संवाद साधला. त्यानंतर तिने आपल्या रूममध्ये जाऊन ओढणीने पंख्याला गळफास घेतला. तिला तातडीने झरी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे महाराष्ट्रातील विवाहित महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकापाठोपाठ घडणाऱ्या या आत्महत्यांमुळे राज्याची मान शरमेने खाली गेली आहे.

गुन्हा दाखल, आरोपींवर कारवाईची मागणी

साक्षीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पती चंद्रप्रकाश लाटे, सासरे भिकुदास लाटे, सासू प्रमिला लाटे, दीर दैवत लाटे, जाऊ सुजाता लाटे आणि नणंद दयावंती यांच्यावर मानसिक व शारीरिक छळाचा आरोप ठेवण्यात आला आहे. परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. महाराष्ट्रातील महिलांच्या या दुर्दैवी घटना कधी थांबणार, हाच खरा प्रश्न आहे.