सार

मुख्यमंत्रिपदावरून विवाद होऊन युती तुटल्यापासून एकमेकांवर टीका करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान भवनाच्या आवारात भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक संवादही झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

 

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राज्यातील बदलेल्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सुरू झालेले राज्य विधानसभेचे अधिवेशन हे अनेक अर्थांनी महत्त्वाचे ठरणार आहे. या अधिवेशनात लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेली सत्ताधारी महायुती आणि विजयामुळे आत्मविश्वास वाढलेली महाविकास आघाडी यांच्यात विविध मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी होण्याचे संकेत मिळत आहेत. अधिवेशनाला सुरुवात होत असतानाच घडलेल्या एका घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर मुख्यमंत्रिपदावरून विवाद होऊन युती तुटल्यापासून एकमेकांवर जहरी टीका करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी विधान भवनाच्या आवारात भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक संवादही झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

ठाकरे-फडणवीसांचे मनोमिलन चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण

मिळालेल्या माहितीनुसार विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी विधानभवनाच्या आवारात भेट झाली. तसेच अनौपचारिक संवादानंतर दोन्ही नेत्यांनी एकाच लिफ्टने प्रवास केला. त्यामुळे बदललेल्या परिस्थितीत भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जवळीकीची ही नांदी तर नाही ना अशी विचारणा राजकीय वर्तुळातून होत आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत ताठर भूमिका घेतली होती. तसेच भाजपासोबतची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी तयार करून सरकार स्थापन केले होते. मात्र पुढे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड घडवून आणत भाजपाने हे सरकार पाडले होते. या सर्व घडामोडींमुळे उद्धव ठाकरे आणि भाजपा नेत्यांमध्ये कटुता निर्माण झाली होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजपाचे बहुमत हुकल्याने अनेक समिकरणे बदलली आहेत. तसेच या निकालाचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर पडण्याची शक्यता असल्याने भाजपा उद्धव ठाकरेंशी असलेली जुनी कटुता विसरून नव्याने मैत्री करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दावे केले जात आहेत. तसेच आज झालेल्या ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील भेटीमुळे या चर्चांना आणखीनच उधाण आलेले आहे.

आणखी वाचा : 

Cabinet Meeting Decisions : अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाने घेतले 7 महत्त्वाचे निर्णय, मुंबई मेट्रो-3 चाही समावेश