सार

तेल्हारा-बेलखेड मार्गावर दोन्ही दुचाकींची समोरा-समोर धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले आहेत. यात एकाच कुटुंबातील 2 युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

अकोला : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा-बेलखेड मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एकजण गंभीर जखमी असून त्यास तत्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन दुचाकीवरुन चारजण प्रवास करत होते, मात्र तेल्हारा-बेलखेड मार्गावर आल्यानंतर दोन्ही दुचाकींची समोरा-समोर धडक बसल्याने भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता एवढी भयानक होती की, दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एका दुचाकीचा भुगा झाल्याचं रस्त्यावर पडलेल्या वस्तूंवरुन दिसून येत आहे.

अपघातील मृतांमध्ये दोन तरुणी आणि एका महिलेचा समावेश आहे. तर, जखमीला तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेतील मृत दोन्ही तरूणी एकाच कुटूंबातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनं गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.