Maharashtra Mayor Reservation 2026 : महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आज मंत्रालयात आरक्षणाची सोडत जाहीर होणार आहे. 50 टक्के महिला आरक्षणामुळे 15 महापालिकांवर महिला महापौर असणार आहे. 

Maharashtra Mayor Reservation 2026 : महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षणाची सोडत जाहीर होणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष मंत्रालयाकडे लागले आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आरक्षण जाहीर होताच राज्यातील महापालिकांच्या राजकारणाला वेग येणार असून, इच्छुक नगरसेवक आणि राजकीय पक्षांच्या हालचाली वाढणार आहेत.

50 टक्के महिला आरक्षणामुळे 15 महापालिकांवर महिला महापौर

राज्यात लागू असलेल्या 50 टक्के महिला आरक्षणाच्या नियमामुळे यंदा 29 पैकी तब्बल 15 महापालिकांमध्ये महिलांना महापौरपदाची संधी मिळणार आहे. उर्वरित 14 महापालिकांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण लागू होणार आहे. महिलांच्या आरक्षणांतर्गत 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिलांसाठी तर 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण निश्चित होणार आहे.

आरक्षण सोडतीनंतर चित्र स्पष्ट होणार

आजच्या सोडतीनंतरच कोणत्या शहरात ओबीसी महिला, खुल्या प्रवर्गातील महिला किंवा अनुसूचित जाती-जमातीसाठी आरक्षण लागू होणार, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे महापौरपदाच्या शर्यतीत असलेल्या इच्छुक नगरसेवकांचे राजकीय भवितव्य या सोडतीवर अवलंबून आहे. आरक्षण जाहीर होताच पक्षांतर्गत हालचालींना वेग येणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

मुंबई महापौरपदासाठी चक्राकार पद्धतीने आरक्षण

मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी आज चक्राकार पद्धतीने आरक्षण काढण्यात येणार आहे. गेल्या वेळी अनुसूचित जाती महिला आणि खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण पडले होते. त्यामुळे यंदा कोणत्या प्रवर्गाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरक्षण जाहीर होताच पक्षांकडून नगरसेवकांची संख्या, प्रवर्गनिहाय गणित आणि संभाव्य उमेदवारांचा आढावा घेतला जाणार आहे.

महापौर निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग

आरक्षण निश्चित झाल्यानंतर महापौरपदासाठी कुणाला उमेदवारी द्यायची, याबाबत राजकीय पक्षांच्या बैठका आणि चर्चांना वेग येणार आहे. त्यामुळे येत्या काही तासांत महापालिका राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.