मुंबई-पुणे मार्गाची ओळख असलेली 'शिवनेरी' बस सेवा आता संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारणार आहे. एसटी महामंडळ २०० नवीन व्होल्वो बसेस आणि ३० स्लिपर कोच दाखल करणार असून, महिला व ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात विशेष सवलतही मिळणार आहे.

मुंबई : मुंबई-पुणे महामार्गाची 'राणी' म्हणून ओळखली जाणारी आलिशान 'शिवनेरी' बस आता केवळ एका मार्गापुरती मर्यादित राहणार नाही. एसटी महामंडळाने या प्रीमियम सेवेचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच राज्याच्या प्रमुख शहरांना जोडण्यासाठी २०० नवीन अत्याधुनिक व्होल्वो बसेस ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

'या' नव्या मार्गांवरून सुसाट धावणार शिवनेरी

पुणे-मुंबईनंतर आता नाशिक, नागपूर, कोल्हापूर यांसारख्या शहरांमधील प्रवाशांनाही हाय-टेक प्रवासाचा आनंद घेता येईल. प्रस्तावित मार्ग खालीलप्रमाणे आहेत.

नाशिक ते: पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे.

पुणे ते: कोल्हापूर, सांगली, सोलापूर.

नागपूर ते: चंद्रपूर, अमरावती, अकोला.

प्रवाशांसाठी खास 'स्लिपर शिवनेरी'

दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी एसटी महामंडळ ३० नवीन शयनयान (Sleeper) शिवनेरी बसेस सुरू करणार आहे. यामुळे रात्रीचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित होणार आहे. अत्याधुनिक बेड-कोच आणि उत्तम सुरक्षितता ही या बसेसची मुख्य वैशिष्ट्ये असतील.

तिकीट दरात कोणाला मिळणार सवलत?

शिवनेरीचा प्रवास आता अधिक खिशाला परवडणारा होणार आहे, कारण सरकारी योजनांचे लाभ या गाड्यांनाही लागू आहेत.

महिला प्रवाशांना: तिकीट दरात थेट ५०% सवलत.

६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिक: तिकीट दरात ५०% सवलत.

७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिक: पूर्णपणे मोफत (१००% सवलत) प्रवास.

का खास आहे ही सेवा?

२००२ मध्ये सुरू झालेल्या शिवनेरीने आपल्या वक्तशीरपणामुळे आणि दर्जेदार आसनव्यवस्थेमुळे प्रवाशांचा विश्वास संपादन केला आहे. सध्या मुंबई-पुणे मार्गावर ई-शिवनेरीला (Electric Bus) मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आता डिझेलवरील अत्याधुनिक व्होल्वो बसेसद्वारे राज्यभर जाळे विस्तारले जात आहे. "हा केवळ बससेवेचा विस्तार नसून महाराष्ट्राच्या गतिमान प्रवास संस्कृतीला दिलेली नवी दिशा आहे," असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.