सार

पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करत आहे. अशा वेळी या प्रवाशांना या मेगाब्लॉकचा अधिक फटका बसू नये याची काळजी कोकण रेल्वे प्रशासनाने घेतली आहे.

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. हा मेगाब्लॉक रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे ते भोके या स्टेशन दरम्यान घेतला जाईल. हा मेगाब्लॉक 24 मे ला घेतला जाणार आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दोन गाड्यांच्या वेळेवर परिणाम होणार आहे. सध्या सुट्ट्यांचा काळ आहे. पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करत आहे. अशा वेळी या प्रवाशांना या मेगाब्लॉकचा अधिक फटका बसू नये याची काळजी कोकण रेल्वे प्रशासनाने घेतली आहे.

सावर्डे ते भोके दरम्यान मेगाब्लॉक

कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवारी म्हणजेच 24 मे ला मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सावर्डे ते भोके दरम्यान रेल्वेमार्ग देखभालीसाठी हा मेगाब्लॉक असेल. सकाळी 7 ते 9.30 या वेळेत हा अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या 2 गाड्यांच्या वेळेवर या मेगाब्लॉकचा परिणाम होणार आहे.

कोणत्या गाड्यांवर होणार परिणाम?

कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या एर्नाकुलम निजामुद्दीन एक्स्प्रेस गाडीवर मडगाव जंक्शन ते रत्नागिरी दरम्यान जवळपास 2 तास परिणाम होईल. तर तिरुनवेली गांधीधाम एक्स्प्रेस गाडीवर मडगाव जंक्शन ते रत्नागिरी दरम्यान 70 मिनिटं परिणाम होईल. अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.