सार

जालना शहरातील अंबड रोडवरील कांचननगर येथील फोटो स्टुडिओशेजारी तब्बल 176 मतदार ओळखपत्र बेवारस अवस्थेत गुरुवारी सकाळी आढळली.

जालना : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच जालन्यात (Jalana) बेवारस मतदान पत्रे (Voting) चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. जालना शहरातील अंबड रोडवरील कांचननगर येथील फोटो स्टुडिओशेजारी तब्बल 176 मतदार ओळखपत्र बेवारस अवस्थेत गुरुवारी सकाळी आढळली. यासंदर्भात माहिती मिळताच निवडणूक अधिकारी आणि महसूल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन ही ओळखपत्रे ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कदीम पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नूतन वसाहत भागातील रहिवासी शुभम नारळे यांना गुरुवारी सकाळी परिसरात मतदार ओळखपत्र बेवारस अवस्थेत आढळून आले. याबाबत त्यांनी तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधत जिल्हा निवडणूक विभाग व कदीम पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर दुपारी महसूल कर्मचाऱ्यांनी मतदान ओळखपत्रांचा पंचनामा केला. मतदानापूर्वीच येथे अशाप्रकारे मतदान ओळखपत्रे आढळून आल्याने परिसरात बोगस मतदानाची चर्चा रंगली आहे.

दानवे विरुद्ध काळे कोण मारणार बाजी?

जालना लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे ला मतदान होत आहेत. महायुतीकडून रावसाहेब दानवे तर महाविकास आघाडीकडून कल्याणराव काळे यांच्यात थेट लढत होत आहे. तर मराठा आरक्षणाचा मुद्दा याच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून राज्यभर पुन्हा पेटला होता. त्यामुळे मनोज जरांगे पाटील व मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट येथील मतदारसंघात होऊ शकतो असे चित्र दिसून येते.