मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची नाशिकला हेलिपॅडवरच तपासणी, निवडणूक आयोगाला काय काय आढळलं?

| Published : May 16 2024, 07:14 PM IST

cm eknath shindes luggage was checked

सार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली.

 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. त्यासाठी नेतेमंडळी हेलिकॉप्टरने प्रवास करत आहेत. तसंच, काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केला. एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरमधून पैसे नेल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपावरून राज्यभरात बराच गदारोळ झाला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजही नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये त्यांचं हेलिकॉप्टर लँड होताच त्यांची बॅग आज तपासण्यात आली.

 

 

एकनाथ शिंदे आजही नाशिक दौऱ्यावर आहेत. आज एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर निलगिरी हेलिपॅडवर लॅण्ड झालं. हेलिकॉप्टर लॅण्ड होताच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, पोलिसांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली. या बॅगांमध्ये कपडे, औषधं आणि अन्य जीवनावश्यक वस्तू आढळल्या आहेत.

दरम्यान, नाशिकची जागा एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पदरात पाडून घेतली आहे. महायुतीत ही जागा कोणाकडे जाईल यावर बरेच दिवस खलबते झाली. अजित पवार गटाकडून या जागेवरून छगन भुजबळांचं नाव चर्चेत होते. खुद्द मोदींनीच याच नावाची शिफारस केली होती, असंही भुजबळांनी सांगितलं होतं. परंतु, नाव जाहीर करण्यास उशीर होत असल्याने प्रचाराला वेळ मिळणार नाही, असं सांगत छगन भुजबळांनी या निवडणुकीतून माघार घेतली. परिणामी एकनाथ शिंदे गटाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी या जागेवर हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आहे. तर, ठाकरे गटाकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे.