Chhagan Bhujbal On Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी श्रीमंत महिलांना योजनेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. ही योजना गरीब महिलांसाठी असून ज्यांच्याकडे गाड्या, बंगले आहेत त्यांनी याचा लाभ घेऊ नये, असे भुजबळ म्हणाले.
नाशिक : राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट आणि थेट भूमिका घेतली आहे. "ज्यांच्याकडे गाड्या, बंगले आहेत, त्यांनी या योजनेपासून दूर राहावं. ही योजना गरीब महिलांसाठी आहे, श्रीमंतांसाठी नव्हे," असा सल्ला त्यांनी दिला आहे.
लासलगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले, "मी याआधीही आवाहन केलं होतं की, ज्यांची पात्रता या योजनेत बसत नाही त्यांनी स्वखुशीनं माघार घ्यावी. आता सुद्धा सांगतो, ज्या घरांमध्ये चारचाकी, बंगले आहेत किंवा उत्पन्नाची मर्यादा ओलांडली आहे, त्यांनी कृपया ही योजना घेऊ नये. यामुळे खऱ्या गरजू महिलांवर अन्याय होतो."
"योजना गरिबांसाठी, पात्रतेचा आदर करा"
भुजबळ पुढे म्हणाले, "सरकार गरिब महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना राबवत आहे. ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचणं हेच आमचं उद्दिष्ट आहे. पोर्टल बंद झालेलं नाही, पण काही गैरवापर रोखण्यासाठी मी तपशीलवार माहिती घेत आहे."
लाडकी बहिण योजना कोणासाठी?
महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला ₹१५०० थेट त्यांच्या खात्यात (DBT) दिले जात आहेत. या योजनेत सहभागी होण्यासाठी महिला महाराष्ट्रच्या रहिवासी असाव्यात आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा अधिक नसावे.
योजनेपासून वंचित राहणाऱ्या व्यक्ती कोण?
वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा अधिक असलेले कुटुंब.
घरात आयकर भरणारा सदस्य.
कुटुंबातील सदस्य शासकीय सेवेत कार्यरत किंवा निवृत्त.
इतर शासकीय योजनांतून दरमहा ₹1500 पेक्षा जास्त लाभ घेणाऱ्या महिला.
माजी/सध्याचे आमदार, खासदार असलेले कुटुंब.
शासकीय बोर्ड/उपक्रमांतील संचालक, अध्यक्ष वगैरे.
कुटुंबात चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) असलेले सदस्य.
"शेतकऱ्यांचं काम करतो, विरोधकांचा वेगळी भूमिका"
भुजबळ यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका करत सांगितलं, "मंत्री झाल्यापासून मला वैयक्तिकरित्या टार्गेट केलं जातंय. पण माझा हेतू स्वच्छ आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी झटत आहे. योजनेत पारदर्शकता आणि गरजूंनाच लाभ मिळावा, हे माझं उद्दिष्ट आहे."


