Konkan Vidhan Parishad Election : कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठा राजकीय घडामोडींचा ट्विस्ट पाहायला मिळाला. ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे.

Konkan Vidhan Parishad Election : राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच कोकणातून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात अनपेक्षित वळण आले असून ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी अचानक आपला अर्ज मागे घेतल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला नवे वळण मिळाले आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

कोकणात मोठा राजकीय ट्विस्ट

कोकण विधान परिषद मतदारसंघात सुरुवातीपासूनच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस पाहायला मिळत होती. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत दाखल झाले आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या अचानक घडलेल्या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

निवडणूक बिनविरोध

बाळ माने यांनी माघार घेतल्याने आता कोकण विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार आहे. या मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे हे उमेदवार आहेत, तर ठाकरे गटाने बाळ माने यांना उमेदवारी दिली होती. मात्र शेवटच्या क्षणी झालेल्या माघारीमुळे निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलले आहे.

बाळ माने कोण आहेत? 

बाळ माने हे पूर्वी भाजपमध्ये कार्यरत होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी उदय सामंत यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर आता त्यांनी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

कोकणातील पक्षनिहाय संख्याबळ 

  • शिवसेना शिंदे गट – 236 
  •  भाजप – 151 
  • राष्ट्रवादी – 63 
  • शिवसेना ठाकरे – 55
  •  काँग्रेस – 50