- Home
- Maharashtra
- Manoj Jarange Patil: 'गढूळ विचारांवर थुंकतो, आता जे होईल ते पाहू!'; मनोज जरांगे यांचा लक्ष्मण हाकेंवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil: 'गढूळ विचारांवर थुंकतो, आता जे होईल ते पाहू!'; मनोज जरांगे यांचा लक्ष्मण हाकेंवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वादग्रस्त विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जरांगेंनी 'लाभार्थी टोळी'वर टीका केली असून, जातींमध्ये भांडण लावण्याचा आरोपही केला आहे.

मनोज जरांगे यांचा लक्ष्मण हाकेंवर हल्ला
जालना: मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वादग्रस्त विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. "आई-बहीणींच्या मर्यादेत आम्ही कधी गेलो नाही, पण आता तुम्ही तिथपर्यंत जात असाल, तर आम्हीही तुमच्यासारख्या गढूळ विचारांच्या लोकांवर थुंकतो. आता जे व्हायचं असेल ते होऊ द्या," अशा स्पष्ट शब्दांत जरांगेंनी इशारा दिला.
जरांगे पाटील अंकुशनगर येथील निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते. ओबीसी समाजाच्यावतीने नागपुरात होणाऱ्या मोर्चावर भाष्य करताना त्यांनी ओबीसी नेत्यांवर टीकेची झोड उठवली. “आम्ही लढून हक्क मिळवतोय आणि ते मोर्चे काढून आभास निर्माण करतात. छगन भुजबळ सारखे नेते बरंच काही बोलत आहेत, पण गेल्या २५ वर्षांचा इतिहास बघा त्यांनी ओबीसींसाठी असलेल्या जागा ओपन वर्गातही घेतल्या आहेत,” असं ते म्हणाले.
"लाभार्थी टोळी"वर कडवट शब्दांत टीका
जरांगेंनी अजित पवार यांच्या 'कोणावरही अन्याय होणार नाही' या वक्तव्यालाही जोरदार प्रत्युत्तर दिलं. “अन्याय आधीच झाला आहे. कार्यकर्त्यांवर आधारित राजकारण हा सगळ्यात मोठा अन्याय आहे. परळीची एक 'लाभार्थी टोळी' प्रत्येक जातीचा केवळ राजकीय स्वार्थासाठी वापर करते,” असा आरोप त्यांनी केला. “धनंजय मुंडे स्वतः बोलू शकत नाहीत म्हणून इतरांच्या तोंडून भाषा ओढून घेतात,” अशी टीका करत त्यांनी जातींमध्ये भांडण लावण्याचा आरोपही केला.
बंजारा समाजासाठी मोजके शब्द, पण स्पष्ट भूमिका
बंजारा समाजाने एसटी प्रवर्गातील आरक्षणाची मागणी केली आहे यावर बोलताना जरांगे म्हणाले, “ज्यांच्या कागदोपत्री नोंदी आहेत, त्यांना आरक्षण नक्की मिळावं. आम्ही जातीवादी नाही. कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं, असं आम्हाला वाटत नाही. आमचा विरोध केवळ ‘लाभार्थी टोळी’शी आहे.”
हाके यांच्यावर थेट इशारा
लक्ष्मण हाके यांच्या विधानावर संताप व्यक्त करत जरांगे म्हणाले, “तुमच्या आई-बहीणीला आम्ही कधी काही बोललो का? तुमची लेक आम्ही आमचीच लेक समजली होती. पण आता या सगळ्याचा सीमारेषा पार झाल्या आहेत. लेकीबाळांबाबत बोलण्याचा अधिकार कोणाने दिला तुम्हाला?”
त्याचबरोबर त्यांनी धनगर समाजालाही सूचित केलं की, “तुमच्यातही ‘लाभार्थी टोळी’ शिरली आहे. गरीब धनगर आणि मराठ्यांमधलं नातं तोडलं जात आहे. आता आम्हीही ‘जशास तसे’ उत्तर देऊ. आमच्या आरक्षणाच्या आड येणार्यांना कोणत्या योजना लागू आहेत हे आम्हाला ठावूक आहे आणि आम्ही त्या योजनाही थांबवू शकतो,” असा थेट इशाराही त्यांनी दिला.
गडकरींना सल्ला, पण सन्मानही
नितीन गडकरी यांच्या ‘आरक्षण हा राजकीय वादाचा विषय झाला आहे’ या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले, “गडकरी साहेब, तुम्ही खरं बोललात. पण आरक्षणाबद्दल बोलताना आमच्या मुला-बाळांच्या अस्मितेवर घाव पडता कामा नये. तुमच्यासारखा विकासाभिमुख, उच्च विचारसरणीचा नेता महाराष्ट्राला हवाच आहे. आमच्या मनातील तुमची प्रतिमा कायम राहावी, एवढंच आम्हाला वाटतं.”
ठाम आणि आक्रमक, जरांगे पाटलांची स्पष्ट भूमिका पुन्हा एकदा चर्चेत
मराठा आणि ओबीसी समाजांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंनी घेतलेली ठाम भूमिका, त्यांची स्पष्ट भाषा आणि ‘लाभार्थी टोळी’वर केलेले गंभीर आरोप पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत.

