महाराष्ट्रातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. 30 जूनपर्यंत HSRP न बसवणाऱ्या वाहनधारकांवर 1 जुलैपासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

HSRP Number Plate Maharashtra : महाराष्ट्रातील लाखो वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही तुमच्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावली आहे का? कारण, हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्याची मूदत आज (30 जून) संपत आहे. अन्यथा 1 जुलैपासून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यासोबत आरटीओ (RTO) कडून मिळणाऱ्या सेवांचाही तुम्हाला लाभ घेता येणार नाहीये.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

1 जुलैपासून कठोर कारवाई

राज्य परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, अंतिम मुदतीनंतर एचआरएसपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांना कोणतीही सूट मिळणार नाहीये. यामुळे मोटार वाहन कायद्यानुसार अशा वाहनांवर 1,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. राज्यात 2.10 कोटी पात्र वाहनांपैकी केवळ सुमारे 1 कोटी वाहनांवरच ही प्लेट बसवण्यात आली आहे. हे प्रमाण अवघे 51 टक्के आहे. त्यामुळे नियमांची अंमलबजावणी अधिक कठोर करण्यात आली आहे.

HSRP नसल्यास RTO च्या अनेक सेवा बंद

एचआरएसपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनधारकांना दंड तर भरावाच लागणार आहे. याशिवाय आरटीओ कडून मिळणाऱ्या अनेक महत्त्वाच्या सेवांचाही लाभ घेता येणार नाही. यामध्ये वाहनाच्या मालकीचे हस्तांतरण (Ownership Transfer), पत्त्यामध्ये बदल, वाहनांसाठी री-रजिस्ट्रेशन (Re-registration), वाहनातील बदलांची नोंद तसेच ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करणे यांसारख्या सेवांचा समावेश आहे. मात्र फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू करण्यासाठी ही अट लागू होणार नाही.

अपॉइंटमेंट बुक केलेल्यांना मिळणार तात्पुरता दिलासा

ज्या वाहनधारकांनी 30 जूनपूर्वी अधिकृत बसवण्यासाठी अपॉइंटमेंट बुक केली आहे, त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाणार नाही. महाराष्ट्र सरकारने एचआरएसपी नंबर प्लेट बसवण्याचे काम तीन विभागांमध्ये विभागून तीन अधिकृत कंपन्यांकडे सोपवले आहे. यामध्ये Rosmerta Technologies Limited, Real Industries Limited आणि FTA HSRP Solutions Private Limited या कंपन्यांचा समावेश आहे.

एचआरएसपी नंबर प्लेट बसवण्यासाठी किती खर्च येणार?

राज्य सरकारने एचआरएसपी नंबर प्लेट बसवण्यासाठी वाहनांच्या प्रकारानुसार शुल्क निश्चित केले आहे.

  • दुचाकी : 450 रुपये (GST वगळून)
  • तीनचाकी : 500 रुपये (GST वगळून)
  • चारचाकी व इतर वाहने : 745 रुपये (GST वगळून)

राज्यात 60 टक्क्यांपेक्षाही कमी वाहनांवर नंबर प्लेट

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, एप्रिल 2019 पूर्वीच्या रजिस्ट्रर वाहनांपैकी 60 टक्क्यांपेक्षाही कमी वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यात आली आहे. डिसेंबर 2024 पासून विशेष मोहीम सुरू करण्यात आली. मात्र नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे आता नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

'आता मुदतवाढ नाही' – परिवहन मंत्र्यांचा स्पष्ट इशारा

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याच्या मुदतीत आणखी कोणतीही वाढ केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही नागरिकांनी नियम गांभीर्याने घेतले नाहीत. यामुळे 1 जुलैपासून दंडात्मक कारवाई निश्चित होणार आहे. यामध्ये कोणालाही सूट दिली जाणार नाही.