आज रात्री होणाऱ्या अर्जेंटिना विरुद्ध स्पेन फुटबॉल सामन्यासाठी राज्य सरकारने हॉटेल्स आणि रेस्टोरंट पहाटे ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. भारतीय वेळेनुसार रात्री १२:३० वाजता सामना सुरू होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी संबंधित हॉटेल मालकांवर असेल.
आज रात्री अर्जेंटिना आणि स्पेन या दोन संघादरम्यान फुटबॉलचा सामना रंगणार आहे. हा सामना जगभरातील प्रेक्षक त्यांच्या टीव्हीवर लावून पाहू शकणार आहेत. भारतीय वेळेनुसार रात्री १२:३० वाजल्यापासून या सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळं राज्य सरकारनं पहाटे ४ वाजेपर्यंत फुटबॉलचे सामने पाहायला हॉटेल्सला परवानगी दिली आहे.
हॉटेल्स राहणार ४ वाजेपर्यंत खुली
राज्यातील हॉटेल्स हे ४ वाजेपर्यंत चालू राहणार आहेत. हॉटेल्स, रेस्टोरंट पहाटेपर्यंत चालू राहून देण्याची विनंती करण्यात आली होती. नियम आणि अटी यांच्या अधीन राहून या विनंतीला परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने हे चालू ठेवण्याची परवानगी देताना काही अटी यावेळी घातल्या आहेत. सदर हॉटेलने याच पालन करणं आवश्यक आहे.
कायदा व सुव्यवस्थेच करावं पालन
संबंधित हॉटेल मालकाने कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे. हॉटेलच्या आत किंवा बाहेर कायदा व सुव्यवस्था खराब होईल असा कोणताही प्रकार घडल्यास त्याची सगळी जबाबदारी ही संबंधित हॉटेलची असणार आहे. या प्रकरणी सर्व ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.


