अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील सहा नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकरी आणि क्लबवर कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे संबंधित उपहारगृहांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

Mumbai : महाराष्ट्रात अन्न सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत मुंबईतील सहा नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकरी आणि क्लबवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार झालेल्या तपासणीत अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघडकीस आले आहेत. यामुळे संबंधित उपहारगृहांचे अन्न सुरक्षा परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये नामांकित उपहारगृहांचा देखील समावेश आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

मुंबईतील 6 नामांकित रेस्टॉरंट्सवर FDA ची कारवाई

एफडीएच्या विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत मुंबईतील अनेक प्रसिद्ध उहारगृहांची पाहणी करण्यात आली. यामध्ये आदित्य बिर्ला समूहाशी संबंधित 'फ्लिंट अँड वार्सा' या नरिमन पॉइंट येथील रेस्टॉरंटसह एकूण सहा हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकरी आणि क्लबमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळले. यानंतर त्यांचे परवाने निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भांडुप, सांताक्रूझ आणि वांद्र्यातही धडक तपासणी

'फ्लिंट अँड वार्सा' रेस्टॉरंटमध्ये तपासणीदरम्यान अन्नपदार्थांच्या चुकीच्या ब्रँडिंगचे प्रकार समोर आले. याशिवाय बोरीवलीतील एम. के. बेकरीमध्ये रिनोव्हेशनचे काम सुरू असतानाही फूड तयार केले जात होते. तसेच तेथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळल्याने कारवाई करण्यात आली. भांडुप, सांताक्रूझ आणि वांद्रे परिसरातील देखील काही उपहागृहांची धडक तपासणी करत नियमभंग करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली.

बनावट एफडीए अधिकाऱ्यांची टोळी उघड

एफडीएच्या सुरू असलेल्या कारवायांचा गैरफायदा घेत काही जण बनावट अधिकारी बनून हॉटेल्समध्ये धाड टाकत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोरिवली पश्चिम येथील एका हॉटेलमध्ये स्वतःला एफडीए अधिकारी असल्याचे सांगत दोन जणांनी अन्न नमुने तपासणीच्या नावाखाली कारवाईची धमकी दिली. त्यांनी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Food Corporation of India) चे बनावट ओळखपत्र दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. हॉटेल मालकाला संशय आल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्राहकांना मोफत शुद्ध पिण्याचे पाणी द्या

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना ग्राहकांना मोफत शुद्ध पाणी देण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहकाने मागणी न करता थेट बाटलीबंद पाणी टेबलवर ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. ग्राहकाने विशेषतः बाटलीबंद पाण्याची मागणी केल्यासच ते द्यावे. तसेच मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध असल्याचा बोर्ड लावणे बंधनकारक असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.

तक्रारींसाठी एफडीएचा हेल्पलाइन क्रमांक

अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचा संशय आल्यास नागरिकांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी एफडीएने टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक 1800-222-365 उपलब्ध करून दिला आहे.