PMPML Pune Tourist Bus Service: पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने पुणे शहर आणि जिल्ह्यातील 13 पर्यटन मार्गांवर विशेष वातानुकूलित इलेक्ट्रिक बससेवा सुरू केली आहे. 

पुणे: पुणेकरांसह बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी मोठी खुशखबर! पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने आता शहर आणि जिल्ह्यातील 13 पर्यटन मार्गांवर विशेष वातानुकूलित इलेक्ट्रिक बससेवा सुरू केली आहे. अवघ्या 500 रुपयांत संपूर्ण दिवसाचं पुणे पर्यटन या बससेवेच्या माध्यमातून करता येणार आहे.

साप्ताहिक सुट्ट्यांसाठी खास संधी

या पर्यटन बस शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये धावणार असून, पुणे आणि जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले, मंदिरं, संग्रहालयं आणि निसर्गरम्य स्थळं पाहण्यासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. खासगी वाहनांवर होणारा खर्च आणि मार्गदर्शनाचा त्रास टाळण्यासाठी ही स्वस्त, सुरक्षित आणि माहितीपूर्ण सेवा पर्यटकांसाठी वरदान ठरणार आहे.

आधुनिक, पर्यावरणपूरक बस

या सर्व बस इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित आहेत. प्रवाशांना आरामदायक प्रवास मिळावा म्हणून स्मार्ट बसचा वापर करण्यात आला आहे. प्रति प्रवास फक्त ₹500 तिकिटदर ठेवण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रत्येक पर्यटनस्थळी थांबा आणि मार्गदर्शनाची सोय असेल.

१३ आकर्षक पर्यटन मार्ग

पुणे व परिसरातील प्रमुख स्थळांना कवेत घेणारे हे 13 मार्ग खालीलप्रमाणे आहेत.

हडपसर – मोरगाव – जेजुरी – सासवड – इस्कॉन मंदिर

हडपसर – सासवड – संगमेश्वर मंदिर – नारायणपूर – हडपसर

पुणे स्टेशन – शिवसृष्टी – स्वामीनारायण मंदिर – तुकाईमाता मंदिर – बनेश्वर मंदिर

टेमघर धरण – निळकंठेश्वर पायथा – झपूर्झा संग्रहालय

पुणे स्टेशन – खडकवासला – पानशेत – गोकुळ फ्लॉवर पार्क – पुणे स्टेशन

पुणे स्टेशन – रामदरा – थेऊर गणपती – प्रयागधाम – पुणे स्टेशन

पुणे स्टेशन – वाघेश्वर मंदिर – रांजणगाव गणपती – पुणे स्टेशन

भक्ती शक्ती निगडी – अप्पूघर – इस्कॉन – मोरया गोसावी – प्रतिशिर्डी – आळंदी

स्वारगेट – पौडगाव – सत्य साईबाबा स्मारक – चिन्मय विभूतीयोग केंद्र – स्वारगेट

स्वारगेट – भोसरी – राजगुरू स्मारक – खंडोबा मंदिर – आळंदी – स्वारगेट

स्वारगेट – एकविरादेवी मंदिर – कार्ला लेणी – लोणावळा – व्हॅक्स म्युझियम

पुणे स्टेशन – भुलेश्वर – त्रिंबकेश्वर हिवरे – सासवड – बनेश्वर – पुणे स्टेशन

(अ) तळजाई, पद्मावती, तुकाईमाता, म्हस्कोबा, यमाई मंदिर यात्रा

(ब) महालक्ष्मी, तांबडी जोगेश्वरी, चतु:शृंगी मंदिर दर्शन

मार्ग क्रमांक 12 आणि 13 हे श्रावण व नवरात्री काळात विशेष चालवले जाणार आहेत.

हरित पर्यटनाचा नवा अध्याय

या उपक्रमामुळे पुणे जिल्ह्यातील धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला नवी चालना मिळणार आहे. इलेक्ट्रिक बसचा वापर केल्याने प्रदूषण नियंत्रण आणि हरित पर्यटनाच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलले गेले आहे.

पीएमपीएमएलचे म्हणणे काय?

“पर्यटकांना सुरक्षित, परवडणारी आणि माहितीपूर्ण सेवा देणे हे आमचे ध्येय आहे. पुण्याचा समृद्ध वारसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे,” असे पीएमपीएमएल प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अवघ्या 500 रुपयांत पुण्याच्या गड-किल्ल्यांपासून मंदिरांपर्यंतचा आनंददायी प्रवास पीएमपीएमएलची इलेक्ट्रिक पर्यटन बससेवा पर्यटकांसाठी नव्या अनुभवाचे दार उघडते आहे.