Vidhan Parishad Election BJP List : पंकजा मुंडेसह सदाभाऊ खोतांना विधानपरिषदेवर संधी, भाजपकडून पाच नावं जाहीर

| Published : Jul 01 2024, 03:46 PM IST

Pankaja munde

सार

Vidhan Parishad Election BJP List : बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षाकडून विधानपरिषदेची संधी देण्यात आली आहे.

Vidhan Parishad Election BJP List : राज्यात होणाऱ्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये पंकजा मुंडेंसह सदाभाऊ खोत आणि परिणय फुकेंच्या नावाचा समावेश आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे.

भाजपचे पाच तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी होणार

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 11 जागा 27 जुलै रोजी रिक्त होत आहेत. या जागा विधानसभा सदस्यांमधून भरल्या जाणार असून सध्याचे संख्याबळ पाहता भाजपच्या 5, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनचे 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी होऊ शकतात.

भाजपकडून विधानपरिषदेसाठी कुणाला संधी?

पंकजा मुंडे

योगेश टिळेकर

परिणय फुके

अमित गोरखे

सदाभाऊ खोत

लोकसभेच्या निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर आता भाजपकडून सावधरित्या पावलं उचलली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून विधानपरिषदेच्या यादीमध्ये जातीय समतोल राखल्याची चर्चा आहे. मित्रपक्षांना संधी म्हणून रयत क्रांती मोर्चाचे सदाभाऊ खोत यांनाही भाजपकडून संधी दिली गेली आहे.

पंकजा मुंडे यांना संधी

बीडमधून पराभवाचा धक्का बसल्यानंतर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा अशी त्यांच्या समर्थकांकडून मागणी केली जात होती. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पंकजा मुंडे यांना विधानसपरिषदेवर संधी देण्याचे भाजपने ठरवले आहे. त्यामुळेच त्यांचे नाव पहिल्या यादीत जाहीर करण्यात आले आहे.

भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी दिल्लीत केंद्रीय नेतृत्त्वाकडे 11 नावांची यादी पाठवण्यात आली होती. आगामी विधानसभा निवडणूक आणि राजकीय समीकरणे लक्ष घेऊन भाजप पक्षश्रेष्ठींनी यापैकी पाच नावांवर शिक्कामोर्तब केले. या निर्णयामुळे पंकजा मुंडे अनेक वर्षांनी पुन्हा एकदा सभागृहात दिसणार आहेत. पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेची उमेदवारी अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात आहे.

बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा समर्थक असलेला वंजारी समाज दुखावला गेला होता. गेल्या काही दिवसांत राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या नाराजीचा भाजपसह महायुतीला मोठा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना देण्यात आलेली विधानपरिषेदची उमेदवारी महत्त्वाची मानली जात आहे.

आणखी वाचा

'राज्यात प्रतिबंधक ठिकाणी पूर्णपणे प्रतिबंध करणार', भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचे सभागृहात निवेदन

 

Related Stories