मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे यांना त्यांच्या धाराशिवमधील वादग्रस्त वक्तव्यावरून समज दिली आहे. नितेश राणे यांच्या 'सगळ्यांचा बाप' या वक्तव्यामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपामध्ये मतभेद निर्माण झाले होते.

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे यांना त्यांच्या धाराशिवमधील वादग्रस्त वक्तव्यावरून समज दिली आहे. आज (१० जून) मुंबईत पत्रकार परिषद घेत फडणवीस यांनी हे स्पष्ट केले.

धाराशिवमध्ये नेमकं काय घडलं?

धाराशिवमधील एका कार्यक्रमात बोलताना नितेश राणे यांनी "राज्यात भाजपाचे सरकार असल्याचे लक्षात ठेवावे, सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय हे सगळ्यांनी लक्षात ठेवा," असे वक्तव्य केले होते. त्यांचा रोख स्थानिक शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या नेत्यांवर होता. या वक्तव्यामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपामध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र निर्माण झाले.

शिंदे गटाची नाराजी आणि राणे बंधूंमधील वाद

नितेश राणे यांच्या वक्तव्यावर शिंदे गटातील नेत्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. यानंतर, शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी नितेश राणे यांना 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट करून फटकारले. "नितेशने जपून बोलावं… मी भेटल्यावर बोलेनच परंतु बोलताना भान ठेवून बोललं पाहिजे," असे निलेश राणे यांनी म्हटले होते. यावर नितेश राणे यांनीही "निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात," असे प्रत्युत्तर दिले. या पोस्ट्सची समाजमाध्यमांवर आणि प्रसारमाध्यमांवर चर्चा सुरू झाल्यानंतर काही वेळाने दोन्ही नेत्यांनी त्यांच्या पोस्ट्स डिलीट केल्या.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत या प्रकरणावर भाष्य केले. ते म्हणाले, "कोणाचाही बाप काढणं चुकीचं आहे. त्यामुळे मी संबंधित मंत्र्यांशी (नितेश राणे) चर्चा देखील केली आहे. त्यांनी स्वतः याबाबत मला सांगितलं की, माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता. त्यावर मी त्यांना सांगितलं की, तुमच्या मनात काहीही अर्थ असला तरी राजकारणात लोकांमध्ये त्या वक्तव्याचा काय अर्थ जातो (Perception) ते अधिक महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोणत्याही नेत्याने अशा प्रकारे बोलणं योग्य नाही. ही बाब त्यांनी (नितेश राणे) मान्य केली आहे."

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच महायुतीमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली ही समज महत्त्वाची मानली जात आहे.