Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित 'महाराष्ट्र नायक' या पुस्तकात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 'महाराष्ट्र नायक' या विशेष कॉफी टेबल पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच पार पडलं. या प्रकाशनप्रसंगी राजकारणातल्या दोन प्रमुख विरोधी नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार फडणवीस यांच्या कार्याची स्तुती करत आश्चर्याचा धक्का दिला आहे. या पुस्तकात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना "हुशार आणि प्रामाणिक राजकारणी" म्हणत केंद्रात मोठी जबाबदारी मिळू शकते, असा विश्वास व्यक्त केला. तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या झपाट्याने केलेल्या कामगिरीवर भर देत, "फडणवीसांची ऊर्जा पाहून मला माझा मुख्यमंत्री कार्यकाळ आठवतो," असे भावनिक विधान केले.
‘महाराष्ट्र नायक’ मागचा संकल्पनाकार
हे पुस्तक भाजप नेते गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलं गेलं असून, राज्यपालांच्या हस्ते त्याचं औपचारिक प्रकाशन करण्यात आलं. यामध्ये अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण, नितीन गडकरी यांचेही लेख आहेत.
“फडणवीसांची ऊर्जा थक्क करणारी” : शरद पवार
“देवेंद्र फडणवीस यांची कार्यक्षमता अफाट आहे. ते आधुनिक विचारांचे नेते आहेत आणि आपल्या वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवत पुढे जात आहेत. त्यांच्या जोमदार कामगिरीने मला माझा पहिला मुख्यमंत्री कार्यकाळ आठवतो. त्यांची ऊर्जा पाहून एकच प्रश्न पडतो हे कधी थकत नाहीत का?” “माझ्या वयापर्यंत त्यांची ही कार्यगती अशीच टिकून राहो,” असं शरद पवारांनी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करताना म्हटलं.
“भविष्यात केंद्रात मोठी जबाबदारी” : उद्धव ठाकरे
"फडणवीस हे एक हुशार, प्रामाणिक आणि उद्दिष्ट साध्य करणारे राजकारणी आहेत. अशा नेत्यांना भविष्यात केंद्रात मोठी जबाबदारी मिळावी, अशी माझी इच्छा आहे," असं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.
राजकीय भुवया उंचावणारी स्तुती
राजकीयदृष्ट्या विरोधी ठिकाणी उभे असलेले ठाकरे आणि पवार यांच्याकडून मिळालेलं हे कौतुक अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरत आहे. काही दिवसांपूर्वी अधिवेशनात फडणवीसांनी ठाकरे गटाला दिलेली ऑफर, तसेच आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांची भेट, यामुळे आधीच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला होता. त्यात आता हे प्रशंसोद्गार अधिकच लक्षवेधी ठरत आहेत.


