सार
बीडमधील संतोष देशमुख प्रकरण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येत आहे. देशमुख यांच्या हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचे नवा समोर आले आहे. हा वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा एकदम जवळचा व्यक्ती समजला जातो. सीआयडीने कराडची बायको मंजीली कराड यांची चौकशी केली असून यामधून काही धागेदोरे निघतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
वाल्मिक कराड यांच्या अंगरक्षकांची चौकशी सुरु
वाल्मिक कराड यांच्या दोन अंगरक्षकांची चौकशी सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. दोन अंगरक्षक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांची कसून चौकशी सुरु आहे. हत्या प्रकरणाला १८ दिवस होऊनही ३ आरोपी फरार आहेत. पोलीस प्रशासनाला अजूनही त्यांना पकडण्यात यश आलेलं नाही. अंगरक्षक कराड यांच्या संपर्कात आहेत का, याचाही तपास घेतला जात आहे.
सुरेश धस यांनी काय आरोप केले? -
बीडच्या घटनेवर भाजप आमदार सुरेश धस यांनी धक्कादायक दावे केले आहेत. बीडच्या सगळ्या प्रकरणांमध्ये आकाचा हात आहे. तो आका आता कुठे आहे, काय करतो याची सर्व माहिती आपण नव्या पोलीस अधीक्षकांना दिल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं. त्यांनी यावेळी बोलताना महादेव बेटिंग अँपबद्दल उद्गार काढल्यामुळे याचे धागेदोरे इथपर्यंत पोहचलेत का, याचाही पोलिसांना तपास लावावा लागणार आहे.