नागपूरमधील सरकारी मुलींच्या वसतिगृहात कुलर नसल्याने विद्यार्थिनींना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत होता. हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
नागपूरमधील सरकारी मुलींच्या वसतिगृहातील उकाड्याच्या समस्येवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थिनींना कुलर मिळत नसल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना फोनवरून चांगलेच फैलावर घेतल्याची चर्चा राज्यभर रंगली आहे. विदर्भात तापमान 45 अंशांच्या पुढे गेले असताना नागपूरच्या बेसा येथील सरकारी मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत होता. स्पर्धा परीक्षा आणि शिक्षणासाठी बाहेरगावाहून आलेल्या मुलींना रात्री झोप न लागणे, त्वचेचे त्रास होणे अशा समस्यांचा सामना करावा लागत होता.

मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचला प्रश्न
मुलींनी वारंवार कुलरची मागणी करूनही प्रशासनाकडून “तांत्रिक अडचणी” असल्याचे कारण दिले जात होते. अखेर हा विषय स्थानिक पदाधिकाऱ्यांमार्फत थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला. माहिती मिळताच फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना कठोर शब्दांत जाब विचारल्याचे सांगितले जात आहे. “आधी तुमच्या कार्यालयातील फॅन आणि कुलर बंद करा, मग मुलींची परिस्थिती समजेल,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सुनावल्याचे वृत्त आहे. या एका फोननंतर प्रशासन तातडीने हलले आणि काही तासांतच वसतिगृहात कुलर पोहोचवण्यात आले.
प्रलंबित प्रश्न लागला मार्गी
यानंतर सरकारने फक्त नागपूरपुरता निर्णय न घेता संपूर्ण विदर्भातील आणि राज्यातील सरकारी वसतिगृहांमध्ये कुलर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. नागपूरमधील विविध मुलींच्या वसतिगृहांसाठी सुमारे 600 कुलर देण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागल्याने विद्यार्थिनींमध्ये समाधान व्यक्त होत आहे. काही विद्यार्थिनींनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानत पत्र लिहिले, तर काहींनी प्रत्यक्ष भेटून कृतज्ञता व्यक्त केली. या घटनेमुळे सरकारी वसतिगृहांतील सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


