सार
वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी आश्रम आज राजकीय आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरला.या आश्रमाचे प्रमुख शांतिगिरी महाराजांच्या भेटीसाठी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघातील निवडणुक लढवित असलेल्या उमेदवारांच्या गाठीभेटीमुळे.
वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी आश्रम आज राजकीय आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरला.या आश्रमाचे प्रमुख शांतिगिरी महाराजांच्या भेटीसाठी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघातील निवडणुक लढवित असलेल्या उमेदवारांच्या गाठीभेटीमुळे. संभाजीनगर जिल्ह्यात संत जनार्दन स्वामींना मानणारा जय बाबाजी भक्त परिवार मोठा असल्याने,शांतिगिरी महाराज या परिवाराला कुठला आदेश देतात ही बाब मात्र गुलदस्त्यात आहे. अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर निर्णय जाहीर करणार असल्याचे आश्रमाचे समन्वयक राजेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.
वेरुळ येथील संत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख शांतिगिरी महाराज हे स्वत: नाशिक लोकसभा मतदार संघातुन अपक्ष निवडणुक लढवित आहेत. प्रचाराच्या व्यस्ततेतुन त्यांनी वेळ काढत आश्रमाला भेट दिली. याची कुणकुण छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना लागताच. एका पाठोपाठ उमेदवारांनी आश्रमाकडे धाव घेतली. सर्व प्रथम एम.आ.एम.चे उमेदवार आणि विद्यमान खासदार असलेले इम्तियाज जलील यांनी शांतिगिरी महाराजांची भेट घेतली. या दोघांमध्ये बंद दाराआड गुफ्तगू झाली. त्यानंतर महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी भेट घेत जय बाबाजी भक्त परिवाराचे आशीर्वाद मागितले. याच ठिकाणी अपक्ष उमेदवार जे.के.जाधव, डॉ.जीवन राजपुत, अपक्ष उमेदवार संजय भास्कर शिरसाठ, शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भारत संभाजी भोसले यांनी देखील शांतिगिरी महाराजांची भेट घेत आशीर्वाद मागितले आहेत.
संत जनार्दन स्वामी आश्रम हे सातत्याने राजकीय घडामेडींचे केंद्रबिंदु असुन, यंदाच्याही लोकसभा निवडणुक प्रचार संपण्याला अवघे तीन दिवस उरलेले असतांना नाशिक लोकसभा मतदार संघाचे उमेदवार शांतिगिरी महाराज व छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या गाठी भेटीने अनेक चर्चाना उधाण आले आहे. त्यामुळे येत्या अक्षय तृतीयेला महाराज कोणाला पाठिंबा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
कोण आहेत शांतिगिरी महाराज ?
शांतीगिरी महाराज हे जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी आहेत. 2004 ला इलाहाबादमधील कुंभमेळ्यात त्यांना महामंडलेश्वर पदवी मिळाली होती. 2009 मध्ये संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत 1 लाख 42 हजार मतं मिळवून तिसऱ्या क्रमांकावर होते. शांतिगिरी महाराजांचं व्यसनमुक्ती, शेती आणि शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान आहे. राज्यातील 1५ ते 1६ जिल्ह्यात जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येने सक्रीय आहे.