बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव तालुक्यातील काही गावांमध्ये ग्रामस्थांची नखं आपोआप तुटत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच याच गावांमध्ये दुषित पाण्यामुळे टक्कल पडत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव तालुक्यातील ग्रामस्थांनी दुषित पाण्यामुळे टक्कल पडत असल्याची तक्रार केली होती. परंतु, आता याच ग्रामस्थांनी नखं आपोआप तुटत असल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली आहे. त्यांचे नखं कमकुवत होत असून त्यांना भेगा पडत असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन सहकार्य करीत नसल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेमुळे पुन्हा एका जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
शेगांवमधील बोंडगाव, कलवाड आणि हिंगणा येथील ग्रामस्थांनी तीन महिन्यांपूर्वी दुषित पाण्यामुळे केस गळती होऊन टक्कल पडत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्य सरकारने केस गळती मागील मुळ कारणांचा शोध घेण्यासाठी भारतीय अनुसंधान परिषदेची (आयसीएमआर) मदत मागितली. परंतु, त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.
यासंदर्भात डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी सांगितले, की हरियाणा आणि पंजाब येथून येणरया गव्हात सेलेनियमचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या गावांमध्ये अचानक केस गळती वाढली आहे. बावस्कर यांनी या प्रकरणी स्वतः तपास केला असता आढळून आले, की या भागातील गव्हात सेलेनियमचे प्रमाण सुमारे ६०० टक्क्यांनी जास्त आहे.
सेलेनियम म्हणजे काय?
सेलेनियम हे एक मिनरल असून जमिनीत आढळून येते. जमिनीत असल्याने ते पाण्यात आणि अन्नातही सापडते. सेलेनियमची फार कमी प्रमाणात शरीराला आवश्यकता असते. परंतु, जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्याचे आरोग्यावर गंभीर स्वरुपाचे परिणाम होतात.


