सार

परळी तालुक्यातील नाथ्रा गावात मुंडे कुटुंबीयांनी एकत्र मतदान केले आहे. यावेळी भाऊ-बहि‍णींनी मतदारांचा उत्साह वाढविला आहे.

बीड : परळी तालुक्यातील नाथ्रा गावात मुंडे कुटुंबीयांनी एकत्र मतदान केले आहे. यावेळी भाऊ-बहि‍णींनी मतदारांचा उत्साह वाढविला आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभुवैद्यनाथांचे दर्शन घेऊन बीड लोकसभा निवडणूकीतील भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे, कृषी मंत्री धनंजय मुंडे, खासदार डाॅ.प्रितम मुंडे यांनी आज नाथ्रा येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे, भगिनी यशश्री मुंडे होत्या.

मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील जनता नेहमीच विकासाच्या बाजूने राहिली आहे, जातीपातीला त्यांनी कधीच थारा दिला नाही. या निवडणुकीतही तेच दिसले. मतदानासाठी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. जनतेचा आशीर्वाद मला असल्याने विजय निश्चित आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनीही नाथ्रा येथे आई रुक्मिणीबाई मुंडे, पत्नी राजश्री मुंडे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला.

सकाळपासूनच वातावरणात उष्णता जाणवत होती तरीही मतदार मोठ्या प्रमाणात मतदान करताना दिसत होते. जागोजागी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.